आवळी खुर्द ते कोलम्बो संघर्षमय कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:28 AM2021-09-14T04:28:05+5:302021-09-14T04:28:05+5:30

सुनील चौगले आमजाई व्हरवडे : घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, गावात क्रीडांगण नाही, मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीसुद्धा नाहीत. अशा प्रतिकूल ...

Awali Khurd to Colombo Struggle Story | आवळी खुर्द ते कोलम्बो संघर्षमय कहाणी

आवळी खुर्द ते कोलम्बो संघर्षमय कहाणी

Next

सुनील चौगले

आमजाई व्हरवडे : घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, गावात क्रीडांगण नाही, मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीसुद्धा नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या जिद्दीने सानिका जाधव या युवतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १६०० मीटर रनिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, तर याच गावच्या पंकज पाटील याने ३००० मीटर रनिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. सानिका जाधव व पंकज पाटील यांची श्रीलंका कोलम्बो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द या दुर्गम भागातील सानिका जाधव व पंकज पाटील या जिगरबाज युवक, युवतीचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. गावातील एका भूमिहीन व ऊसतोड मजुराची मुलगी सानिका दिनकर जाधव या एकोणीस वर्षांच्या युवतीने नवा आदर्श निर्माण केला आहे. घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य; पण परिस्थितीचा बाऊ करीत बसण्यापेक्षा क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय या जिद्दीने सानिकाने गेल्या तीन वर्षांपासून गावच्या डोंगरावर रनिंग या क्रीडा प्रकारचा सराव सुरू केला. बघता बघता क्रीडा स्पर्धेत यश मिळू लागले.

स्थानिक पातळीवर मॅरेथॉन स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली. विविध स्पर्धेतील मिळणाऱ्या यशामुळे सानिका जाधवचा आत्मविश्वास वाढला. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सानिकाने भोगावती कॉलेज कुरुकली येथे प्रवेश घेतला अन् सानिका जाधव हिच्या क्रीडा करिअरला खरे वळण मिळाले. येथील प्रा. संजय पाटील, प्रा. राहुल लहाने यांनी विशेष मार्गदर्शन केले. पीरवाडी येथील विशाल निकम, विश्वजित कापसे, सरदार पुजारी यांनी रनिंग स्पर्धेविषयी मार्गदशन केले. विशाल निकम यांनी शासकीय असो अथवा संघटनेच्या क्रीडा स्पर्धा असो, अशी कोणतीही स्पर्धा चुकवली नाही. कोरोना कालावधीत घरच्यांना मदत करीत आपला सराव सुरू ठेवला. जिल्हा स्तर, राज्यस्तर ॲथलेटिक्स स्पर्धेत सुयश मिळविले, तर जयपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सीनिअर गटात महिला विभागात १६०० मीटर रनिंग या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर याच गावचा पंकज पाटील हा यशवंतराव चव्हाण कॉलेज कोल्हापूर येथील खेळाडू. पंकजने ३००० मीटर रनिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. सानिका व पंकज यांची निवड आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स युथ गेम क्रीडा स्पर्धा श्रीलंका कोलम्बो येथे झाली आहे. एका भूमिहीन ऊसतोड मजूर दाम्पत्याची मुलगी परदेशात रनिंग स्पर्धेत जाणार, तर पितृछत्र हरवलेला पंकज पाटील हासुद्धा युथ गेमसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार याचा अभिमान गावातील नागरिकांना झाला आहे. गावातील अनेक नागरिक सानिका व पंकजचा सत्कार करीत आहेत.

आर्थिक मदतीची गरज

सानिका जाधव आणि पंकज पाटील हे आवळी खुर्द गावातील अत्यंत गरिबीत जीवन जगत आहेत. स्पर्धेसाठी शूज अथवा किट घेण्याची कुवत त्यांच्याकडे नाही. तरीसुद्धा युथ गेममध्ये पदक जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती बाळगून हे दोघेही आहेत. समाजातील दानशूर व राजकीय व्यक्तींनी या दोन्ही उदयोन्मुख खेळाडूंना आर्थिक हातभार लावण्याची गरज आहे.

१३सानिका जाधव

१३पंकज पाटील

Web Title: Awali Khurd to Colombo Struggle Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.