पुरस्काराने साहित्याची उंची वाढत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:13 AM2018-11-26T01:13:13+5:302018-11-26T01:13:19+5:30
निपाणी : पुरस्काराने कोणत्याही साहित्याची उंची वाढत नाही, तर लेखकाने लिहलेले साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज मराठी ...
निपाणी : पुरस्काराने कोणत्याही साहित्याची उंची वाढत नाही, तर लेखकाने लिहलेले साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज मराठी साहित्याची अवस्था भयानक असून, वाचकांची संख्या घटलेली आहे. आज लेखकाचे आयुष्य संपते, पण त्याने लिहिलेल्या साहित्याची पहिली आवृत्ती संपत नाही, अशी काहीशी अवस्था आहे. मराठी साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरवली आहे. याची गंभीर दखल सर्वांनी घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.
कारदगा येथे शहीद सुनील भोसले व्यासपीठावर पार पडलेल्या २३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले, कारदगा हे गाव साहित्याचा जल्लोष करणारे गाव आहे. पालावरच साहित्य हे पानावर येण्यास ग्रामीण साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षा अशी ग्रामीण संमेलने महत्त्वाची आहेत कारण हे सर्वांपर्यंत पोहोचत आहे. अभिव्यक्तीची मुस्कटदाबी झाल्याशिवाय साहित्यिकांना संधी मिळत नाही.
यावेळी व्यासपीठावर ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, डॉ. आनंद काटीकर, डॉ. सी. बी. कोरे रेंदाळकर, ग्रामपंचायत अध्यक्षा शिऊबाई गावडे, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, उत्तम पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुमित्रा उगळे, लक्ष्मणराव चिंगळे, दादासो नरगट्टे, चंद्रकुमार नलगे, रामभाऊ पाटील, कल्पना रायजाधव, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कल्पना रायजाधव यांच्या ‘आम्ही घडलो तुम्हीही घडा’ या व कबीर वराळे यांच्या ‘किलबिल’ व ‘महाचंद्र’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सकाळी संपूर्ण गावात ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
दुसऱ्या सत्रात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांचे ‘आम्ही वारसदार मावळ्यांचे’ या विषयावर व्याख्यान झाले. शास्वत ग्रामविकासावर चंद्रकांत दळवी यांचे व्याख्यान झाले. प्रसिद्ध कवी नितीन देशमुख, नारायण पुरी, रवींद्र केसकर यांनी कविता सादर केल्या.
मराठी साहित्य वाढावे
रा. रं. बोराडे म्हणाले की, कारदगा गावाने मराठीपण जपलेच, पण कन्नड भाषेचा अभिमान ठेवला. आज साहित्य संमेलन गावोगावी होतात, पण मराठी भाषेचा वाचक वाढला का? हा प्रश्न आहे. कन्नडमधील अनेक पुस्तके मराठीत आली, पण मराठीतील पुस्तके कन्नड भाषेत प्रकाशित होणे गरजेचे आहे. साहित्य किती लोकांपर्यंत पोहोचले यावर त्याची उंची ठरते.