कोल्हापूर : विषयाच्या सांकेतिक क्रमांकाबाबतच्या (सब्जेक्ट कोड) तांत्रिक अडचणीमुळे शिवाजी विद्यापीठाने हिवाळी सत्रातील बी.कॉम., बी.एस्सी.सह पाच अभ्यासक्रमांच्या (नियमित अथवा सीबीसीएस) अंतिम (तृतीय) वर्षाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. या परीक्षा आता दि. १२ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने बुधवारी घेतला. या परीक्षांच्या सुधारित तारखा देखील जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठाने पूर्वनियोजनानुसार दि. २२ मार्चपासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. पण, सब्जेक्ट कोडबाबतच्या तांत्रिक अडचणीमुळे तृतीय वर्ष सत्र पाच आणि सहामधील बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बॅचलर ऑफ फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट, बी. एस्सी. फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय विद्यापीठाने दि. २१ मार्च रोजी जाहीर केला. या परीक्षांच्या सुधारित तारखा ठरविण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळातील अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. त्यातील निर्णयानुसार या पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. १२ एप्रिलपासून सुरू होतील. त्याची माहिती परीक्षा मंडळाने विद्यापीठातील अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. दरम्यान, पूर्वनियोजनानुसार या अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्या पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे परीक्षा पुन्हा कधी होणार याची कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती. सुधारित तारखा जाहीर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
अंतिम वर्षातील परीक्षांच्या सुधारित तारखा
बी. कॉम. : १२ एप्रिल
बॅचलर ऑफ फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट : १२ एप्रिल
बी. एस्सी. फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट : १२ एप्रिल
बी. एस्सी : १७ एप्रिल
बी. ए. : ४ मे
प्रतिक्रिया
या अभ्यासक्रमांच्या सुधारित सविस्तर वेळापत्रक यशावकाश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संबंधित ऑन परीक्षा विभागाकडून जाहीर करण्यात येईल. या परीक्षांच्या सुधारित तारखा विद्यार्थ्यांसह सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना अधिविभाग, महाविद्यालयांना केली आहे.
-गजानन पळसे, प्रभारी संचालक, परीक्षा मंडळ.