‘गोकुळ’ रणांगणात ‘बाबां’चे अस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:24 AM2021-05-01T04:24:02+5:302021-05-01T04:24:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’चे रणांगण आरोप-प्रत्यारोपामुळे धगधगत असताना आता शेवटचे अस्त्र म्हणून ‘बाबां’ना बाहेर काढले आहे. दोन्ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे रणांगण आरोप-प्रत्यारोपामुळे धगधगत असताना आता शेवटचे अस्त्र म्हणून ‘बाबां’ना बाहेर काढले आहे. दोन्ही आघाड्यांनी ठरावधारकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी महाराजांच्या ताकदीचा वापर सुरू केला असून, ‘आंध्र’ व कर्नाटकातील महाराजांनी कोल्हापुरात तळ ठोकला आहे.
‘गोकुळ’च्या सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी दोन्ही आघाडींच्या नेत्यांची आहे. गेली दोन महिने एकमेकांवर आरोप करून वस्त्रहरण करण्याची एकही संधी नेत्यांनी सोडलेली नाही. प्रचार सभांतील आरोप-प्रत्यारोपांबरोबरच ठरावधारकांकडे केलेल्या भांडवली गुंतवणुकीने जिल्हा ढवळून निघाला. सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांची बदनामी करण्यातही आघाड्यांचे नेते मागे राहिले नाहीत.
उद्या, रविवारी मतदान होत आहे, सुमारे दोन हजार ठरावधारक दोन्ही आघाड्यांच्या ताब्यात आहेत. तरीही विजयाची खात्री नसल्याने शेवटचे ‘बाबा’ अस्त्र बाहेर काढले आहे. प्रत्येक निवडणुकीत या अस्त्राचा वापर केला जातो. मात्र, ‘गोकुळ‘मध्ये थेट आंध्र प्रदेश व कर्नाटकातील महाराजांना कोल्हापुरात पाचारण केले आहे. शुक्रवार ते रविवारी असे तीन दिवस ते कोल्हापुरात तळ ठोकून राहणार आहेत.
‘शिष्य’ की ‘गुरू’ भारी पडणार
एका आघाडीने आंध्र प्रदेशमधून बड्या बाबांच्या शिष्याला आणले आहे, तर दुसऱ्या आघाडीने कर्नाटकातील थेट गुरूलाच आणले आहे. ‘गोकुळ’च्या रणांगणात ‘गुरू’, शिष्याला चीतपट करणार की शिष्य गुरूचा पट काढणार, हे मंगळवारी दिसणार आहे.