इचलकरंजी : उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणातील तिघा संशयितांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला.
रवीकिरण बाबूराव सोकाशे, दत्तात्रय महादेव धुमाळे व दत्तात्रय गणपती गुरव अशी त्यांची नावे आहेत. घोडावत यांच्याकडे नवी दिल्ली व्ही. पी. सिंग व मुंबईतील रमेश ठक्कर यांनी बनावट दस्तावेज आणि सोशल मीडियावर संदेश पाठवून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी एक लाख रुपये स्वीकारताना ठक्कर याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, घोडावत यांच्या व्यवसायाची कागदपत्रे सोकाशे, धुमाळे व गुरव यांनी पुरविली असल्याचा संशय घोडावत यांनी व्यक्त केला होता. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. या तिघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. अॅड. मेहबूब बाणदार व अॅड. सुनील मुदगल यांनी युक्तिवाद केला. त्यामध्ये तिघे संशयित हे घोडावत यांचे माजी कर्मचारी आहेत. त्यांची देय रक्कम बाकी आहे. त्याबाबत न्यायालयात दावाही दाखल आहे. त्यांच्याबाबत पुरावा नाही. संशयावरून अटक केली आहे, आदी मुद्दे मांडले. त्यामुळे न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.