जामीनदारच्या नातेवाइकाचा कर्जदारावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:25 AM2021-09-19T04:25:48+5:302021-09-19T04:25:48+5:30
कोल्हापूर : पैशाच्या कारणावरून झालेल्या वादावादीत जामीनदारच्या नातेवाइकांनी कर्जदार व त्याच्या मुलावर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही ...
कोल्हापूर : पैशाच्या कारणावरून झालेल्या वादावादीत जामीनदारच्या नातेवाइकांनी कर्जदार व त्याच्या मुलावर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी दीनानाथ मंगेशकरनगरात घडली. सुरेश चुनीलाल शर्मा (वय ५१), बाबा सुरेश शर्मा (२६ दोघेही रा. दीनानाथ मंगेशकरनगर, मंगळवार पेठ), अशी जखमी पिता-पुत्रांची नावे आहेत. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आर्यश ऊर्फ मॅगी शिवाजी शिंदे व कुणाल गवळी (दोघेही रा. प्रॅक्टिस क्लबनजीक, मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश शर्मा व त्यांचा मुलगा बाबा शर्मा हे आइस्क्रीम व भेळ विक्रेते आहेत. यांच्या बँकेतील कर्जाला आर्यश शिंदे याची आजी सुशीला रामदास आडके या जामीनदार आहेत. जामीनचे पैसे घेण्यावरून शर्मा व शिंदे यांच्यात वाद उफाळला. त्यातून एकमेकांना शिवीगाळचा प्रकार घडला. यातून संशयित आरोपींनी चाकूने शर्मा पिता-पुत्रावर हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश शर्मा यांच्या मानेवर, तर फिर्यादी बाबा शर्मा याच्या डोक्यावर व पाठीत वार झाल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी दोघांनाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.