कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध; १८ गावे कडकडीत बंद, पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी
By भारत चव्हाण | Published: October 12, 2023 04:34 PM2023-10-12T16:34:29+5:302023-10-12T16:38:46+5:30
सुळकुडचं पाणी देणार नाही, मग आम्हाला कशाला सांगता?
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला शहरालगतच्या अठरा गावातील ग्रामस्थांनी कडकडीत ‘गांव बंद’ आंदोलन करुन विरोध केला. गांव बंद आंदोलनात सहभागी झालेल्या गावातील सरपंच, उपसरपंच तसेच सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दुपारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची भेट घेऊन हद्दवाढीला आपला तीव्र विरोध असल्याचे सांगितले. तसेच विरोध असतानाही एकतर्फी निर्णय घेऊन जर निर्णय घेतलाच तर याहीपेक्षा उग्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय गेल्या काही दिवसापासून गाजत आहे. एकीकडे शहरातून हद्दवाढीची मागणी होत आहे, तर दुसरीकडे ग्रामिण भागातून या हद्दवाढीला तीव्र विरोध होत आहे. चार दिवसापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली तेंव्हा शहरालगतची काही गावे घेऊन हद्दवाढ करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचे तीव्र पडसाद अठरा गावातून उमटले. सोमवारी मेळावा घेऊन सर्वांनी ठामपणे विरोध करण्याचा तसेच गुरुवारी गांव बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार उचगांव, कळंबा, पाचगांव, मोरेवाडी, गांधीनगर, मुडशिंगी, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगांव, शिरोली, वडणगे, नागदेववाडी, बालिंगा, शिंगणापूर, पीरवाडी, नागाव, वळीवडे, आंबेवाडी येथील ग्रामस्थांनी आपले गांव बंद ठेऊन हद्दवाढीला विरोध केला. काही गावातून प्रमुख कार्यकर्त्यांनी गावातून निषेध फेरी काढून व्यवहार बंद ठेवण्याचे गावकऱ्यांना आवाहन केले. त्यामुळे गावातील मेडिकल दुकाने वगळता शाळा, दुकाने, कारखाने, भाजी मंडई, सलून दुकाने, भांड्याची, कपड्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एरव्ही गजबजलेला गावगाडा गुरुवारी मात्र शांत दिसत होता. रस्ते ओस पडले होते.
आम्ही समाधानी, शहरात येण्याचा प्रश्नच नाही
दरम्यान, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अठरा गावातील सरपंच, उपसरपंच तसेच सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वेळ निदर्शने केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अठरा गावांचा शहराच्या हद्दवाढीत समाविष्ट होण्यास तीव्र विरोध असल्याचे सांगितले. आमच्या ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य सरकारकडून थेट निधी येतो. त्यामुळे आम्ही आमच्या गावांचा विकास करण्यास सक्षम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहरात नागरी सुविधांची वाणवा
शहरातील नागरी सुविधांची दुरावस्था तसेच ग्रामिण भागातील विकास कामे यातील फरकही जिल्हाधिकाऱ्यांना पटवून देण्यात आले. काेल्हापूर शहरात कचरा उठाव होत नाही, पाणी पुरवठ्याची व्यवस्था नीट होत नाही. रस्ते अतिशय खराब झाले आहेत. नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्यात महापालिकेला अडचणी येत आहेत. अशा परिस्थीतीत आमची गावे शहरात समाविष्ट करणे योग्य नाही, असेही शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सुळकुडचं पाणी देणार नाही, मग आम्हाला कशाला सांगता?
पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सुळकुड येथून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही, असे सांगत आहेत. जर ही योजना राबविली तर रक्ताचे पाट वाहतील असा इशाराही त्यांनी दिला होता. पालकमंत्री कागलचे आहेत की कोल्हापूरचे? जर पालकमंत्री सुळकुडचं पाणी देणार नसतील तर त्यांना आमच्यावर जबरदस्ती करण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल उचगांवचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी उपस्थित केला.
तर जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव
जर आमच्या भावनेचा विचार केला नाही, आणि एकतर्फी हद्दवाढ करण्याचा निर्णय घेतला तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. मग आमरण उपोषण, मोर्चे, जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव यासारखे आंदोलन असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सरपंच मधुकर चव्हाण (उचगांव), सुमन गुरव (कळंबा), प्रियांका पाटील (पाचगांव), आनंदा कांबळे (मोरेवाडी), संदीप पाटाेळे (गांधीनगर), अश्विनी शिरगांवे ( मुडशिंगी), उत्तम बांबवडे (उजळाईवाडी), शुभांगी आडसुळ (सरनोबतवाडी), चंद्रकांत डावरे( गोकुळ शिरगांव), संगीता पाटील (वडणगे), रसिका पाटील (शिंगणापूर), संदीप मिठारी (पीरवाडी), यांच्यासह बालिंगा व नागदेववाडी सरपंचांचा समावेश होता.