कोल्हापूर : सुकडीऐवजी मिळणारे धान्य, कडधान्य, गरम ताजा आहार आणि आकार अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्या सध्या हाऊसफुल्ल होत आहेत. पटसंख्येत वाढ झाल्याने सध्याच्या अंगणवाड्यांची जागा अपुरी पडत आहे. दाटीवाटीने मुलांना बसविण्याची वेळ सेविका, मदतनिसांवर आली आहे.
जिल्ह्यात चार हजार ३६९ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात तीन हजार ९९४, तर इचलकरंजी शहरात २00 आणि इतर नगरपालिका क्षेत्रात १७५ अशा अंगणवाड्या सध्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यामार्फत ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो.
सध्या या सर्व घटकांना शासनाकडून सुकडीसारख्या पॅकेट बंद आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. त्याऐवजी धान्य, कडधान्य, तेल, डाळी मिळत आहेत. पोषणाबरोबरच तयार धान्य, तेल मिळत असल्याने अंगणवाड्यांमध्ये नोंदणी करण्याकडे कल वाढला आहे. तसेच बालकांसाठी गरम ताजा आहारही दिला जात आहे. नोंदणी केल्यानंतरच हा सर्व शिधा मिळत असल्याने आतापर्यंत या आहाराकडे पाठ फिरविणारेही आवर्जून नोंंदणीसाठी आग्रह धरू लागले आहेत. मागणीही वाढू लागली आहे. आहार व धान्य मिळू लागल्याने साहजिकच त्याचा परिणाम पटसंख्या वाढण्यावर झाला आहे.बालकांचा बुद्ध्यांक वाढलाअंगणवाड्यांमध्ये गर्दी वाढण्यामागे पोषण आहाराइतकेच तेथील गुणवत्तापूर्ण शिक्षणही कारणीभूत आहे. आकार हा अभ्यासक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासाला फारच उपयुक्त ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. प्ले स्कूल व नर्सरीमुळे पैसे खर्च करून दोन-तीन वर्षे घालविल्यानंतरही जितके शिक्षण त्या बालकांना मिळणार नाही, तितके श्क्षिण अंगणवाडीमध्ये एका वर्षभरात मिळत आहे. त्यामुळे मुलांचा बुद्धांकही वाढीस लागला आहे. त्यामुळे मोफत शिक्षण व आहार मिळत असल्याने अंगणवाड्यांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे.प्रवेशोत्सवाची राज्याने घेतली दखल : अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची संख्या वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने प्रवेशोत्सव हा उपक्रम घेतला. त्याचेही चांगले परिणाम दिसत आहेत. दरवर्षी गुढी पाडव्याला हा उपक्रम राबविला जातो. बालकांना वाजत-गाजत अंगणवाडीत प्रवेश दिला जातो. याचे अनुकरण आता राज्यभर केले जात आहे. आता दर महिन्याला प्रवेशोत्सव घेण्याचे नियोजन सुरू आहे.२0१८ मध्ये ९0 टक्के प्रवेश झाले, २0१९ मध्ये हेच प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. वर्षागणिक प्रवेश वाढतच चालले आहेत. सध्या चार हजार ९६९ अंगणवाड्यांमध्ये एक लाख ५६९ बालके शिक्षण घेत आहेत.
खासगी शाळांच्या कितीतरी पटीने अधिक गुणवत्ता अंगणवाड्यांमध्ये आहे. आकारसारख्या अभ्यासक्रमाची जर शंभर टक्के अंमलबजावणी झाली, तर या गुणवत्तेत आणखी भर पडणार आहे. अंगणवाडीतील मुले खासगी स्कूलच्या स्पर्धेत खूप पुढे निघून जाणार आहेत.- सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.