‘बापू, हम शर्मिंदा हैं..आपके कातिल जिंदा हैं’
By admin | Published: January 31, 2017 12:42 AM2017-01-31T00:42:13+5:302017-01-31T00:42:13+5:30
घोषणांनी सारा परिसर दुमदुमला : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात रॅलीचे आयोजन
कोल्हापूर : ‘बापू, हम शर्मिंदा हैं, आपके कातिल जिंदा हैं,’ ‘इतिहासाचे विकृतीकरण थांबवा’, ‘मानवता हाच धर्म’, ‘धर्मनिरपेक्षता जिंदाबाद’, ‘मैं भी गांधी, तू भी गांधी’, ‘अहिंसा हेच बलवानाचे शस्त्र आहे...’अशा घोषणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सोमवारी आदरांजली वाहण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, आॅल इंडिया यूथ फेडरेशनच्यावतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर हसिना फरास यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. त्यांनी उपस्थितांना धर्मनिरपेक्षता व भारतीय संविधानाची मूल्ये अंगीकारण्याची शपथ दिली. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, भरत रसाळे, एस. डी. लाड, एस. जी. तोडकर, आर. डी. पाटील, सुधाकर सावंत, गिरीष फोंडे, प्रा. नामदेव गावडे, मुकुंद कदम, व्ही. यु. नागरगोजे, गीतांजली लाड, मनिषा कदम, एस. आर. मुळे आदी उपस्थित होते. गांधी मैदान येथून रॅलीला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, खासबागमार्गे बिंदू चौकात आल्यानंतर रॅलीची सांगता झाली. त्यात महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेज, इंदुमती गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
‘आम्ही भारतीय’चे मूक धरणे
महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त ‘आम्ही भारतीय लोकआंदोलन’तर्फे वरुणतीर्थ मैदान येथी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक धरणे करण्यात आले. गांधीजींचे प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो त्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यासाठी आयोजित या धरणे आंदोलनात महापौर हसिना फरास, बाळ पोतदार, अॅड. अशोक साळोखे, चंद्रकांत यादव, संभाजी जगदाळे, भारत घोंगडे, महादेव पडवळे, शंकर काटाळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, आदिल फरास, आर. एस. आलासे यांनी सहभाग घेतला.