‘गोकुळ’च्या मैदानात ‘सतेज-महाडिक’यांची अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:23 AM2021-04-25T04:23:33+5:302021-04-25T04:23:33+5:30

राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दुधाला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे. दूध उत्पादकांच्या प्रश्नाआडून पालकमंत्री सतेज ...

The battle for the existence of 'Satej-Mahadik' in the field of 'Gokul' | ‘गोकुळ’च्या मैदानात ‘सतेज-महाडिक’यांची अस्तित्वाची लढाई

‘गोकुळ’च्या मैदानात ‘सतेज-महाडिक’यांची अस्तित्वाची लढाई

Next

राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दुधाला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे. दूध उत्पादकांच्या प्रश्नाआडून पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष टोकाला जाणार आहे. दोन्ही नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, येथील जय-पराजयाचे दूरगामी राजकीय परिणाम होणार असल्याने आरोप प्रत्यारोपातून एकमेकांस उघडे पाडण्याची संधी सोडणार नाहीत, हे निश्चित आहे.

सहकाराची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थांच्या निवडणुकांत इर्षा नवीन नाही. साखर कारखान्यासह इतर संस्थांमध्ये दोन गट आमनेसामने असतात, तिथेही टीका टिपणी होते. मात्र, ‘गोकुळ’चे राजकारण हे वेगळ्या वळणावर पोहचले आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वच निवडणुका या ‘गोकुळ’च्या राजकारणाभोवतीच फिरल्या आहेत. त्यातही या निवडणुकांना मंत्री सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्या संघर्षाची किनार पहावयास मिळाली. त्यामुळे प्रत्यक्ष ‘गोकुळ’च्या रणांगणात हा संघर्ष उफाळून आला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही प्रचाराने गती घेतली आहे. मेळावे, गाठीभेटी, बैठकांतून एक एक ठराव बाजूला काढण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मंत्री पाटील व महाडिक यांच्यातील संघर्ष जुना असला तरी ‘गोकुळ’ची निवडणूक दोघांचे अस्तित्व ठरवणारी आहे. त्यामुळे दोघांनी ठराव आपल्या माणसांच्या नावावर करण्यापासून ते दाखल करेपर्यंत कंबर कसली. आता प्रत्यक्ष रणांगण सुरू झाल्याने दोघांनीही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. सत्तारूढ गटाचे महाडिक यांच्यासह आमदार पी. एन. पाटील तर विरोधी आघाडीचे मंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आदी नेतृत्व करत आहेत. मात्र, विरोधी आघाडीचा रोख हा महाडिक तर सत्तारूढ गटाचा मंत्री पाटील हेच आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी आरोप केले तरी सत्तारूढ गट त्या ताकदीने उत्तर देण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर मंत्री पाटील हे पी. एन. पाटील यांच्यावर टीका करणे टाळत आहेत. ‘गोकुळ’मधील जय-पराजयाचे दूरगामी परिणाम महाडिक व पाटील यांच्या राजकारणावर होणार असल्याने अस्तित्वासाठी साम, दाम, दंड या सर्व नीतीचा वापर होणार आहे.

‘गोकुळ’वर ‘राजाराम’चे भवितव्य

‘गोकुळ’ व ‘राजाराम साखर कारखाना या दोन संस्था महादेवराव महाडिक यांची शक्तिकेंद्रे आहेत. येथेच त्यांना रोखण्याचे प्रयत्न मंत्री पाटील गेली दहा वर्षे करत आहेत. ‘राजाराम’च्या सभासद वाढीसह इतर बाबींवर पाच वर्षांत पाटील यांनी अंकुश ठेवला आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या निकालावरच ‘राजाराम’चे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

याभोवतीच फिरणार प्रचार-

सत्तारूढ गट-

३,१३,२३ ला न चुकता दूध बिले

उत्पन्नातील ८१ टक्के परतावा

उत्पादकांना वर्षाला ९८ कोटी दरफरक

महालक्ष्मी दूध संघ

विरोधी गट-

टँकर भाडे, पुण्यातील दूध वितरण एजन्सी

मल्टीस्टेट, वासाचे दूध

उत्पादकांना दोन रुपये जादा दर

गोपाल दूध डेअरी

Web Title: The battle for the existence of 'Satej-Mahadik' in the field of 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.