दूध उत्पादकांसाठी लढाई : सतेज पाटील ‘गोकुळ’वर मोर्चा: व्यापाºयाचा ‘गोकुळ’शी काय संबंध?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:01 PM2017-11-27T23:01:38+5:302017-11-27T23:04:50+5:30
कोल्हापूर : दूध वाहतुकीचे टँकर, वार्षिक तीनशे कोटींच्या खरेदीसह सर्वच पातळीवर ‘गोकुळ’मध्ये व्यापारी मंडळीचा लूट करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचा उद्योग सुरू आहे.
कोल्हापूर : दूध वाहतुकीचे टँकर, वार्षिक तीनशे कोटींच्या खरेदीसह सर्वच पातळीवर ‘गोकुळ’मध्ये व्यापारी मंडळीचा लूट करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचा उद्योग सुरू आहे. २७ कोटींचा अनावश्यक खर्च केला जातो पण दिवस-रात्र शेणा-मुतात राबणाºया उत्पादकाला कपात केलेले दोन रुपये देण्यासाठी संचालकांकडे पैसे नाहीत, हे दुर्दैवी असून दूध उत्पादकांच्या हितासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण येथील बोक्यांना हाकलून लावण्यासाठी आर-पारची लढाई करू, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.
गाय दूध खरेदी दरवाढीबाबत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’वर जिल्ह्णातील दूध उत्पादकांचा सोमवारी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी पाटील यांनी महादेवराव महाडिक व संचालक मंडळावर जोरदार हल्ला चढवत उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढाई कायम ठेवण्याचा निर्धार केला. सासने ग्राऊंड येथून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. पितळी गणपती चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
आमदार पाटील म्हणाले, लाखो दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर अवलंबून आहेत, याची जाणीव असल्यानेच आम्ही जादा दूध दराची मागणी करतो. आम्हाला संघाची बदनामी करून तो मोडायचा नाही. संघाला लागलेल्या भ्रष्टाचाºयाच्या किडीचा वेळीच पायबंद केला नाही तर उद्या या ठिकाणी ‘गोकुळ’ संघ होता, असेच सांगावे लागेल. दूध उत्पादकांच्या हितासाठी दोन रुपये दरवाढ करण्याची मागणी करत आहोत. मी ‘गोकुळ’च्या कारभारावर टीका करतो तर व्यापारी माझ्यावर करत आहे. त्यांनी माझ्या संस्था व माझ्यावर खुशाल टीका करावी, पण पहिल्यांदा ‘गोकुळ’बाबत केलेल्या आरोपांची उत्तरे त्यांनी द्यावीत.
या व्यापाºयाचा ‘गोकुळ’शी काय संबंध? टँकर व तीनशे कोटींच्या खरेदीवर डल्ला मारणे एवढ्यासाठीच त्यांना संघ हवा आहे. म्हैस दुधात ४० टक्के गायीचे दूध मिसळतात, हा आजही आमचा दावा आहे. तो खोटा म्हणून संचालकांनी सांगावा. मग २५ रुपयाचे गायीचे दूध ५४ रुपयांना म्हशीचे म्हणून विकता तरीही तुम्हाला परवडत कसे नाही? ‘वारणा’पेक्षा ‘गोकुळ’चे टँकर भाडे प्रतिकिलो मीटर ५० पैसे जास्त आहे. हे टँकर कोणाचे?, तुम्ही कोणाचा फायदा करण्यासाठी उत्पादकांचे खिसे मारता? याची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागतील.
...नंदीबैलच
मोर्चात गायीसह नंदीबैलाचा समावेश होता. गायींच्या पाठीवर विविध स्लोगन लिहिलेले फलक होते तर नंदीबैलाच्या गळ्यात ‘व्यापारी बोले...संचालक डोले, संचालक कसले नंदीबैलच ते ’ असा फलक अडकवला होता. तो फलक सर्वांचा लक्ष वेधत होता.
मोबाईल वापरास बंदी
पावडर चोरी बाहेर आल्यापासून कर्मचाºयांना मोबाईल वापरास बंदी केली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध संघावर (गोकुळ) सोमवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दूध उत्पादकानी मोर्चा काढला.