बावड्याचा आठवडी बाजार बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:08+5:302021-04-18T04:22:08+5:30
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे आज, रविवारी (दि.१८) कसबा बावडा येथे भरणारा ...
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे आज, रविवारी (दि.१८) कसबा बावडा येथे भरणारा आठवडा बाजार शेतकरी, व्यापारी यांनी स्वयंफूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेतला. त्यामुळे मंडईत भाजी विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी व भाजी खरेदीसाठी नागरिकांनी फिरकू नये, असे आवाहन भाजी मंडई व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश उलपे यांनी केले आहे. कसबा बावड्यात रविवारी मोठा आठवडी बाजार भरतो. बावडा, वडणगे, निगवे, शिये, भुये, जठारवाडी, टोप, पेठवडगाव आदी परिसरातून शेतकरी व व्यापारी येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. तसेच बावडा, ताराबाई पार्क, न्यू पॅलेस, लाईन बाजार आदी परिसरातून नागरिक येथे भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे या बाजारात प्रचंड मोठी गर्दी होते. बाजारातील उलाढालही लाखोंच्या घरात जाते. कोरोनामुळे रविवारचा आठवडी बाजार भरेल की नाही याची हमी नसल्याने काही भाजी विक्रेत्यांनी शनिवारी मंडईत ठाण मांडले होते; पण त्यांना भाजी विक्री करण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी गल्लोगल्ली फिरून भाजी विकली, तर काही तुरळक भाजी विक्रेते मुख्य रस्त्यावर भाजी विकताना दिसले. भाजी विक्रीबरोबरच मंडईतील अन्य सर्व दुकानेही रविवारी बंद राहणार आहेत. यातील काही दुकाने संचारबंदी लागू झाल्यापासून बंद ठेवण्यात आली आहेत.
चौकट : मुख्य रस्त्यावर वर्दळ
औद्योगिक वसाहतीमध्ये कामानिमित्त ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांमुळे बावड्याच्या मुख्य रस्त्यावर संचारबंदीतही वर्दळ दिसून येते. मुख्य रस्त्यावरील जीवनावश्यक दुकाने उघडी आहेत. इतर दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. भगवा चौक व शुगर मिल कॉर्नर येथे पोलीस बंदोबस्त आहे. ते वाहनांची कसून तपासणी करत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरही स्थानिक लोकांच्या वाहनांची वर्दळ फारशी दिसत नाही.
फोटो :१७ कसबा बावडा बाजार
कसबा बावडा येथील भाजी मंडई शनिवारी अशी कडकडीत बंद होती. तसेच मंडईशेजारील दुकाने व टपऱ्याही बंद होत्या. त्यामुळे हा परिसर शांत भासत होता.
(फोटो : रमेश पाटील , कसबा बावडा )