लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण (जि. रत्नागिरी) : राष्ट्रपतींनी केलेल्या सूचनेनुसार आपण चिपळूणमधील स्थितीचा आढावा घेतला आहे. येथील बिकट स्थितीची कल्पना आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली आहे. त्यामुळे लवकरच केंद्रीय पथक येथे पाहणी करण्यासाठी येणार आहे. सगळा देश तुमच्यासोबत आहे. धीर धरा, असा दिलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिपळूणवासीयांना दिला. त्याचवेळी प्रत्येक पूरग्रस्त नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.
राज्यपाल कोश्यारी यांनी मंगळवारी चिपळूण येथील बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला.
कोश्यारी म्हणाले, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल. त्यासाठी केंद्राचे एक पाहणी पथक लवकरच दौरा करील. संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार आशिष शेलार, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पूरपरिस्थिती व प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती राज्यपालांना दिली. त्याचप्रमाणे सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली.