बेळगाव- नवी दिल्ली थेट विमानसेवा १३ ऑगस्टपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:50+5:302021-07-28T04:26:50+5:30
बेळगाव ते नवी दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी आता पूर्ण होणार आहे. स्पाईस जेट एअरलाईन्सने येत्या ...
बेळगाव ते नवी दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी आता पूर्ण होणार आहे. स्पाईस जेट एअरलाईन्सने येत्या १३ ऑगस्ट २०२१ पासून बेळगाव ते नवी दिल्ली थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील आमदार-खासदार, मान्यवर राजकीय नेते, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण संस्था, हवाई दल, एमआयएलआरसी, सशस्त्र दल, केंद्र आणि राज्य सरकारी खाती तसेच इतर संस्था यांच्याकडून बेळगाव ते नवी दिल्ली विमान सेवा सुरू करावी अशी मागणी केली जात होती. स्पाइस जेट एअरलाइन्स शुक्रवार दि १३ ऑगस्ट २०२१ पासून प्रारंभी सोमवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील दोन दिवस बेळगावहून थेट दिल्लीला आपली विमान सेवा सुरू करत आहे. बोईंग ७३७ या १४९ आसनी विमानाद्वारे लेह -दिल्ली -बेळगाव -दिल्ली अशी ही विमानसेवा कार्यरत राहणार आहे. या विमानाचे सायंकाळी ४:३५ वाजता बेळगाव विमानतळावर आगमन होईल आणि ५:०५ वाजता ते दिल्लीला प्रयाण करेल. थेट दिल्ली विमानसेवा सुरू झाल्यामुळे त्यांना बेळगावहून अडीच तासात नवी दिल्ली गाठता येणार आहे. बेळगाव विमानतळावरून सायंकाळी ५:०५ वाजता प्रयाण करणारे स्पाइस जेटचे विमान सायंकाळी ७:३० वाजता दिल्लीला पोहोचणार आहे.
खास करून बेळगावातील संरक्षण दलाच्या अधिकारी, कर्मचारी आणि जवानांचे दिल्लीला कायम येणे-जाणे असते. त्यामुळे एमएलआयआरसी, सीआरपीएफ, भारतीय हवाई दल आदींसाठी ही विमानसेवा उपयुक्त ठरणार असल्याने बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी आभार मानले आहेत. लेहशी हे विमान कनेक्ट असल्यामुळे संरक्षण दलातील जवानांना याचा फायदा होणार आहे असेही मौर्य यांनी स्पष्ट केले.