डिजिटल पेमेंट व्यापाऱ्यांना फायदेशीर : खंडेलवाल
By admin | Published: January 11, 2017 12:45 AM2017-01-11T00:45:05+5:302017-01-11T00:45:05+5:30
व्यापाऱ्यांची परिषद : कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन व चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे आयोजन
कोल्हापूर : पुढील काळातील आव्हाने ओळखून ‘डिजिटल पेमेंट’ या संकल्पनेचा जास्तीत जास्त वापर करा. जी.एस.टी. हा डिजिटल पेमेंटचाच एक भाग असल्याचे मत, कन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सचे (क ॅट) राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी कोल्हापुरात व्यक्त केले.
ते दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन व कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीज यांच्यातर्फे मंगळवारी सायंकाळी आयोजित ‘अर्थव्यवस्थेतील बदलाचा व्यापार-उद्योगावरील परिणाम’ या विषयावरील परिषदेत बोलत होते. यावेळी दि आॅल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील व ‘फिक्की’चे संचालक ललित गांधी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवन येथे ही परिषद झाली.
प्रवीण खंडेलवाल म्हणाले, आजच्या स्थितीत व्यापाऱ्यांना अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे पुढील काळात व्यापारवृद्धीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता के्रडिट, डेबिट, एन.एफ.टी. आणि आर.टी.जी.एस. करावे लागणार आहे. हा डिजिटल पेमेंटचा भाग आहे. त्याचबरोबर रोख स्वरूपात, धनादेशचे (चेक) व्यवहार यापुढे चालणार नाहीत. डिजिटल पेमेंटमुळे एनएफटी व आरटीजीएस या माध्यमांतून सरकारचा परतावा व्यापाऱ्यांना मिळणार आहे. त्याचा फायदा महसूलमध्ये वाढ होऊन गुणांकन मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटचा जास्तीत जास्त वापर करा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची व्यापाऱ्यांनी कास धरावी.
आनंद माने म्हणाले, नोटाबंदीमुळे व्यवसायाचे वातावरण मारक झाले आहे. तसेच आॅनलाईन, एफडीए, मॉल अशा स्पर्धेमुळे छोट्या व्यावसायिकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावेळी जीएसटी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये योग्य ते बदल करणे जरुरीचे आहे, अशी माहिती टॅली सॉफ्टवेअरच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
फेडरेशनचे अध्यक्ष दीपक शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी आनंद माने, धनंजय दुग्गे, संजय शेटे, संजय पाटील, शिवाजी पोवार, नयन प्रसादे यांचा खंडेलवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धैर्यशील पाटील, ललित गांधी यांची भाषणे झाली. सचिव प्रशांत शिंदे यांनी आभार मानले.
विमानतळ विकसित होणे गरजेचे
कोल्हापूरचा विमानतळ विकसित होणे हे येथील व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तो विकसित झाल्यास विकासाला आणखी चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे मत प्रवीण खंडेलवाल यांनी यावेळी व्यक्त केले.
दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन व कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीज यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मंगळवारी कन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी शाहू स्मारक भवनात मार्गदर्शन केले. यावेळी संजयकुमार पाटील, विजय नारायणपुरे, दीपक शहा, ललित गांधी, धैर्यशील पाटील, आनंद माने, प्रशांत शिंदे, अतुल दोशी, प्रदीपभाई कापडिया उपस्थित होते.