पट्टणकोडोली : तळंदगे, ता. हातकणंगले येथील लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्या शेतात भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या शेतात लिंबू ,बाहुल्या, बिबा, मीठ, कवारू, टाचण्या, खिळे, नारळ, गुलाल आदी वस्तू ठेवल्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरपंच संदीप पोळ हे निवडून येऊन एक वर्ष झाले. याचा आनंद उत्सव साजरा करत असतानाच, त्यांना या पदावरून खाली खेचण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या शेतात भानामतीचा प्रकार घडवून आणला आहे.
त्यांचे शेत हे रस्त्याच्या कडेलाच असल्याने येणाऱ्या - जाणाऱ्यांची नजर त्यावर जात होती. ही माहिती सरपंचांना मिळतात सरपंच संदीप पोळ यांनी अंधश्रद्धेला खतपाणी न घालता न घाबरता सर्व साहित्य एकत्र करून हे साहित्य त्याच ठिकाणी जाळून टाकले; पण कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात अशा प्रकारची कृती अजूनही काही अल्पसंतुष्ट लोक करतात याबद्दल परिसरात जोरदार चर्चा चालू आहे.
आपण एक उच्चशिक्षित असून, आपण छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे आहोत. त्यामुळे अशा कृत्यांना आपण भीत नाही तसेच महाराष्ट्र शासनाने अशा अघोरी, अमानुष, जादूटोणा, आदींचे समूळ उच्चाटन करणेबाबत २०१३ सालीच कायदा बनवला आहे. त्यामुळे अशा कृतीला आपण घाबरतही नाही. - संदीप पोळ, लोकनियुक्त सरपंच