भोगावतीचा ऊस तोडणी कार्यक्रम पारदर्शक
By admin | Published: February 9, 2015 12:13 AM2015-02-09T00:13:26+5:302015-02-09T00:41:24+5:30
ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान : तोडणी-ओढणीत धांदलबाजी करणाऱ्या वाहनांवर कारवाई
भोगावती : भोगावती साखर कारखान्यातर्फे तोडणी-ओढणी कार्यक्रमात सध्या केलेल्या आमूलाग्र बदलाने ऊस उत्पादक सभासदांत स्वागत होत आहे. संचालक मंडळाला उशिरा सूचलेले शहाणपण, अशी टीका होत असली तरी याची अंमलबजावणी अत्यंत कडक व कायमपणे केली जावी, अशीही मागणी होत आहे.कारखाना कोणताही असो, तोडणी-ओढणी हा विषय थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असतो. ऊस वेळेत गेला नाही, तर शेतकऱ्याला हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागते.
‘भोगावती’च्या सत्ताधाऱ्यांना अखेर पाचव्या वर्षी हे शहाणपण आले आणि मुख्य शेती अधिकारी बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोडणी कार्यक्रम अत्यंत पारदर्शक आणि कडक ठेवण्यात आला आहे. लागण ऊस तोडणीत काही बड्या शेतकऱ्यांनी खोडवा तोडण्याचा प्रकार केला. त्यांचा ऊस कारखान्याने स्वीकारला नाही. तोडणी-ओढणीत धांदलबाजी करणाऱ्या वाहनांना दहा-दहा दिवस निलंबित करण्यात आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ऊस बाहेरील कारखान्यांना घातला आहे. सध्या तोडणी पाळीपत्रक तारखेप्रमाणे राबविले जात आहे. यात कोणीही बदल करण्याचे धाडस केलेले नाही.
यात कोणत्याही संचालकांचा हस्तक्षेप होत नाही. ऊस उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे.
१तोडणी-ओढणीत कोणत्याही कर्मचाऱ्याने धांदलबाजी केल्यास ‘घरचा रस्ता’ हे सूत्र शेती विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू केले आहे.
२संचालकांनी किंबहुना अध्यक्ष-उपाध्यक्षांनी, कार्यकारी संचालकांनी तोडणी-ओढणी शिफारस केली, तरी ती तोंडी न घेता लेखी मागण्यांचा कर्मचाऱ्यांना अधिकार दिला.
३ तोडणी-ओढणीसाठी संचालकांच्या व गट कार्यकर्त्यांवरील गर्दी गायब झाल्याचे चित्र.