विनोद सावंत/लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्चभ्रु, मध्यमवर्गीय वस्ती असणारा राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग क्रमांक ३७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत बिग फाइट लढत आहे. सर्वसाधारण प्रभाग झाल्याने मातब्बर उमेदवार रिंगणात असून, त्यांच्यात चुरशीची लढत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने केलेल्या विकासकामांमुळे विरोधी पक्षांतील उमेदवारांना आव्हान निर्माण केले आहे. सध्याच्या घडीला पाच ते सहा तगडे उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
शहरातील हायव्होल्टेज लढतीपैकी राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग आहे. सर्व मातब्बर उमेदवार असल्याने त्यांच्याकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा आवलंब केला जात आहे. सध्या निवडणुकीची तारीख निश्चित नसली तरी येथील वातावरण तापलेलेच आहे. गत निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी या प्रभागात बाजी मारली. राष्ट्रवादीच्या मृदुला पुरेकर यांनी त्यांना चांगली लढत दिली. भाजपच्या वैशाली पसारे यांनी तिसऱ्या क्रमांकाची तर काँग्रेसच्या माया संकपाळ यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली.
प्रतिज्ञा उत्तुरे सलग चार वर्षे स्थायी समिती सदस्य होत्या. त्या महापालिकेच्या पहिल्या महिला परिवहन समिती सभापती ठरल्या. सभापती असताना त्यांनी केएमटीचे उत्पन्न वाढीसाठी उल्लेखनीय काम केले. सीएनजी बस, महिलांसाठी ई-टाॅयलेट, बसमध्ये एलईडी संच, पार्किंग अद्ययावत करून उत्पन्नवाढीचा प्रयत्न केला. प्रधान कार्यालय नूतनीकरण, मुख्य यंत्रशाळा परिसरात सोलर सिस्टीम बसविण्यास मंजुरी आणली. महापूर आणि कोरोनामध्ये प्रभागात मदतकार्य केले. या कामाच्या जोरावर प्रतिज्ञा उत्तुरे किंवा त्यांचे पती महेश उत्तुरे रिंगणात उतरणार आहेत.
माजी नगरसेवक मुरलीधर जाधव यांचा राजारामपुरी एक्स्टेंशन हा प्रभाग क्रमांक ३९ महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी या प्रभागामधून वहिनी दीपिका दीपक जाधव यांना रिंगणात उतरविले आहे, तर स्वत: प्रभाग क्रमांक ३७ मधून निवडणूक लढविणार आहेत. जाधव कुटुंबीयांनी आतापर्यंत पाचवेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. दीपक जाधव दोनवेळा नगरसेवक होते. यामध्ये त्यांनी महापौरपदही भूषवले. मुरलीधर जाधव यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले असून, गतसभागृहात त्यांनी स्थायी समिती सभापतीपद भूषवले आहे. प्रभाग क्रमांक ३९ मधील बहुतांशी प्रभागात २००५ ते २०१५ मध्ये त्यांनी काम केले असून, हा आपला बालेकिल्ला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोनामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याबाबत ते आमदार विनय कोरे, ज्येष्ठ नगरसेवक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेणार आहेत.
शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनीही जोरदार तयारी केली आहे. २०१० मध्ये थोडक्या मताने पराभूत झाल्यानंतर त्यांनी न खचत सामाजिक काम सुरूच ठेवले. २०१५ मध्ये प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नाही. प्रतिज्ञा उत्तुरे यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. गेल्या १७ वर्षांपासून राजारामपुरीत ते रक्तदान शिबिर घेतात. ‘राजारामपुरी गोज ग्रीन’च्या माध्यमातून ते सामाजिक कामात सक्रिय आहेत. गेल्या २० वर्षांपासून वृक्षारोपण मोहीम राबवत आहेत. शहराच्या टोल, एलबीटी, घरफाळा, वीजदरवाढ रूपांतरित कर नोटीससंदर्भातील आंदोलनात ते सहभागी असतात. या प्रभागातून ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक वैभव ऊर्फ रामा पसारे यांनीही प्रभागात प्रचार सुरू केला आहे. कोरोनाकाळात त्यांनी राजाराम तलाव जलतरण मंडळाच्या माध्यमातून मदत केली. तेही काँग्रेसकडून इच्छुक आहेत. भाजपचे राजारामपुरी मंडल सरचिटणीस अभिजीत शिंदे गेल्या अडीच वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. आयुष्यमान भारत योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप तसेच कोरोनाकाळातही त्यांनी मदतीचा हात दिला. या कामाच्या जोरावर ते भाजपमधून इच्छुक आहेत. तसेच नितीन पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे.
प्रतिक्रिया
राज्य शासन, जिल्हा नियोजन, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तब्बल १३ कोटींचा निधी खेचून आणला. प्रभागातील ८० टक्के ड्रेनेजलाइन, पिण्याची पाइपलाइन बदलणे, तसेच प्रभागातील ३० वर्षे प्रलंबित असलेला रस्ते, ड्रेनेजलाइन, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला. केएमटीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा १० वर्षे रखडलेला फंड व पेन्शनचा प्रश्न मार्गी लावला. बाळासाहेब ठाकरे उद्यानाचा ठराव तसेच भाडेकरार रद्द करणे असे महत्त्वाचे ठराव केले आहेत.
चौकट
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
प्रतिज्ञा उत्तुरे (शिवसेना) ११७६
मृदुला पुरेकर (राष्ट्रवादी) ९०९
वैशाली पसारे (भाजप) ८६५
माया संकपाळ (काँग्रेस) ५५०
चौकट
पाच वर्षांत झालेली प्रमुख कामे
राजारामपुरीत जुन्या पाइपलाइनमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नवीन पाइपलाइन टाकून तो मार्गी लावला.
नऊ नंबर शाळेच्या मैदानात नवीन पाण्याची टाकी उभारून राजारामपुरीचा पाण्याचा प्रश्न सोडवला.
शाळा क्रमांक ९ मैदानाचे सुशोभीकरण
प्रभागातील ९० टक्के ड्रेनेजलाईन बदलली, प्रत्येकांना नवीन पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तसेच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा
संपूर्ण प्रभागात एलईडी
प्रभागातील ८० परिसरातील महावितरणच्या केबल भूमिगत केल्या.
प्रभागातील प्रमुख रस्त्यांवर फुटपाथ उभारले
गल्ली क्रमांक ९ ते १४ मुख्य पाइपलाइन बसवून २५ वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडवला.
प्रभागातील २७ पॅसेज आणि २५ मुख्य गल्लीतील डांबरीकरण केले
चौकट
शिल्लक कामे
मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास
२० टक्के गटारी करणे बाकी
पॅसेज, बोळातील नियमित स्वच्छता होत नाही.
बाजारपेठ असल्याने पार्किंगची समस्या, सीसीटीव्हीचा अभाव
फोटो : १५०३२०२१ कोल महेश उत्तुरे नावाने
ओळी : कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक ३७ राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल प्रभागातील खराब रस्ते नव्याने करण्यात आले आहेत.