कोट्यवधीच्या डांबरी रस्त्यावर लाल मातीचा थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:13+5:302021-05-03T04:18:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : ट्रॅक्टर-ट्राॅलीत शिघ लावून भरलेली लाल माती हेलकाव्याने डांबरी रस्त्यावर विसकटल्याने डांबरी रस्त्यावर ...

Billions of layers of red soil on asphalt roads | कोट्यवधीच्या डांबरी रस्त्यावर लाल मातीचा थर

कोट्यवधीच्या डांबरी रस्त्यावर लाल मातीचा थर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

पोर्ले तर्फ ठाणे : ट्रॅक्टर-ट्राॅलीत शिघ लावून भरलेली लाल माती हेलकाव्याने डांबरी रस्त्यावर विसकटल्याने डांबरी रस्त्यावर लाल मातीचा थर साचत आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणेपासून ते कोतोली फाट्यापर्यंतच्या कोतोली-नांदगाव रस्त्यावर पसरलेले मातीचे धुलिकण डोळ्यात जात आहेत. परिणामी वळवाच्या पावसाने रस्त्यावर चिखल होऊन दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत आहेत. वाहतूकदारांच्या बेपर्वाईमुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला डांबरी रस्ता लाल मातीमय होत आहे.

परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. अनेक नियम पायदळी तुडवत नदीकाठचे माती उत्खनन सुरू आहे. वीटभट्टी व्यावसायिक पावसाळ्यापूर्वी मातीची साठवणूक करतात. तसेच दलदलयुक्त शेतीच्या घातीसाठी लाल मातीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

माती खरेदीपासून ते ती पोहोच करण्यापर्यंत ठेकेदारांचे एक जाळे तयार झाले आहे. मातीच्या वाहतुकीसाठी रस्त्यावरून ट्रॅक्टर-ट्राॅलीच्या जादा खेपांसाठी शर्यत सुरू असते. पळवापळवीच्या नादात शिघ लावून भरलेल्या ट्राॅलीतील माती हेलकाव्याने रस्त्यावर पसरत आहे. ढीग लावून भरलेली ट्राॅली जागेवरच तोपर्यंत निम्मी रिकामी होत असते. अर्धवट माती रस्त्यावरचं पडत असते. रस्त्यावर पडलेल्या मातीवरून घसरून आणि मातीचे धुलिकण डोळ्यात जाऊन अपघात घडले आहेत. माती वाहतूकदारांना प्रवाशांनी वेळोवेळी ताकीद दिली तरी, त्यांची बेपर्वाई कमी होत नाही. रस्त्यावर माती सांडून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या वाहतुकीला कोण आळा घालणार का? असा सवाल प्रवाशांतून होत आहे.

चौकट

वाहतुकीची जीवघेणी स्पर्धा

नदीकाठची लाल माती ट्रॅक्टर-ट्रॅाली आणि डंपरमधून वीट व्यावसायिकांना पोहोच केली जाते. यासाठी अंतरानुसार प्रत्येक खेपेला मोबदला ठरलेला असतो. या सुध्दा वाहतूकदारांची स्पर्धात्मक ईर्षा पाहावयास मिळते. त्यामुळे दरम्यानच्या रस्त्यावर माती वाहतूकदारांची दिवसा-ढवळ्या किंवा रात्री-अपरात्री खेपेसाठी स्पर्धा सुरू असते. त्यातून शिघ लावून भरलेल्या ट्राॅलीतील माती हेलकाव्याने सांडत असते. त्याची या वाहतूकदारांना पर्वा नसते. वाहतूकदारांची ही शर्यत इतर वाहतुकीला जीवघेणी ठरू शकते.

Web Title: Billions of layers of red soil on asphalt roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.