बिरोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात वाशी बिरदेव जळयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:51 AM2021-03-17T11:51:27+5:302021-03-17T12:16:26+5:30
Religious programme Washi Kolhapur- "सुंबरान मांडलं, धनगरानं माडलं,बिरोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात खारीक, खोबरं भंडाऱ्याच्या उधळणीत ढोलाच्या, कैताडच्या निनादात, भाविकाविना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा या राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी ता. करवीर येथील बिरदेवाची त्रैवार्षिक जळयात्रेतील मुख्य दिवस पार पडला. आज, बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस आहे.
सडोली (खालसा)/कोल्हापूर : "सुंबरान मांडलं, धनगरानं माडलं,बिरोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात खारीक, खोबरं भंडाऱ्याच्या उधळणीत ढोलाच्या, कैताडच्या निनादात, भाविकाविना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा या राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी ता. करवीर येथील बिरदेवाची त्रैवार्षिक जळयात्रेतील मुख्य दिवस पार पडला. आज, बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस आहे.
बिरोबा देवाचा यात्रेतील दुसऱ्या दिवशी (दुसरी पालखी) पहाटे आरती करण्यात आली. बिरोबाच्या नावाने चांगभलं घ्याच्या गजरात डोक्यावर आंबिलचे कलश घेऊन गावातील सुहासिनीनी वडी भाकरी, पुरणपोळीचे नैवेद्य अर्पण केले.
कांडगाव (ता. करवीर) येथील मगदुम नरके-नाईक घराण्याला गाडा (बैलजोडी) आणण्याचा मान आहे. दुपारी १४ बैल जोडुन सजवलेल्या सात बैलगाड्या आणण्यात आल्या. मानाच्या गाड्यांचे स्वागत रानगे पुजारी यांनी केले. परंतु कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर केवळ दहा मानकऱ्याना प्रवेश देण्यात आला. यावेळी भिमराव मगदुम, संभाजी पाटील(पाटील), नारायण नाईक (कोतवाल) या मानकऱ्यासह सविता मगदूम यांना सुवासिनीचा मान देण्यात आला.
साडेचार वाजता पालखीभेट सोहळा पार पडला. संध्याकाळी हेडाम, भाकणूक, छबिना मिरवणूक देव जळ खडकास जळास जाणे व वांझ मेंढीचे दुध काढणे, मानाचे बकरे मांडीवर घेऊन तलवारीने तोडणे व दाताने बकरे तोडण्याचे धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. आज, बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस आहे. यादिवशी ग्रामस्थ व भाविक सुमारे दहा ते पंधरा हजार बकऱ्याचा बळी चढवतात परंतु शासनाने यात्रेवर निर्बंध आणल्याने बकऱ्याना जीवदान मिळाले आहे.
यावेळी बबन रानगे, के.डी.सी.बँकेच्या संचालिका उदयानी देवी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे, सरपंच गिता लोहार, उपसरपंच संगिता पाटील, अरूण मोरे, संदीप पाटील, इंद्रजित पाटील, ग्रामसेविका टी.जी अत्तार, ग्रामसेवक एकनाथ शिंदे, बिरदेवालयाचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी, रंगराव पुजारी, कृष्णात पुजारी, लक्ष्मण पुजारी यांच्यासह ट्रस्टचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. करवीरचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यात्रा रद्द झाल्यामुळे कोट्यावधीचे नुकसान
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर वाशी येथील जळयात्रा रद्द झाल्याने खेळणी, मिठाई, पाळणे, नारळ व इतर दुकानदाराचे व व्यापाऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.