आई सरस्वती गेली..मायेचा आधार गेला, कायम उणीव भासणार; चंद्रकांतदादांनी व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:45 PM2022-07-26T18:45:28+5:302022-07-26T18:45:51+5:30
ती इथे घरात होती त्यामुळे मी निर्धास्त होतो. निश्चिंत होताे. मात्र आता मात्र तिची कायम उणीव भासत राहील.
माझी आई निपाणीची. जमादार यांच्या घरातील. निरक्षर. सहीदेखील करता येत नव्हती. परंतु तिचे व्यवहारज्ञान चोख होते. माझी सावत्र आईही होती. तीदेखील वडिलांसोबत मिलमध्ये काम करत असे. आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो. पण कधीही आईने तक्रार केली नाही. पूर्वी मुंबईत कोणीही गावाकडचा नातेवाईक शिकण्यासाठी, नोकरीसाठी येणार असेल तर तो तिथल्या आपल्या पाहुण्यांकडे राहत असे. हीच परंपरा आमच्या घरी होती. त्यामुळे मावसभाऊ, भाचा असे अनेकजण घरी रहायलाही होते. अभाविपचे काम सुरू केल्यानंतर तर घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या खूपच वाढली. परंतु कधीही आईने याबद्दल तक्रार केली नाही. कटकट केली नाही. श्रावण महिन्याआधी तर विनोद तावडे यांच्यापासून ते आशिष शेलार यांच्यापर्यंत अनेकजण घरी हक्काने यायचेच.
कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये ती अस्वस्थ व्हायची नाही. शांत रहायची. मला तिच्या या गुणाचे खूप अप्रूप वाटायचे. तोच गुण अंगी बाणवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी अभाविपचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला वडिलांचा मोठा विरोध होता. परंतु माझी आई आणि सावत्र आईने त्यांची समजूत काढली. मी वेळेत लग्न करावं, संसार करावा असा लकडा आईने माझ्या मागे लावला. मी लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचणारा. त्यामुळे संन्यस्त वृत्तीने काम करावे अशी माझी भूमिका होती. परंतु एक-दोन वर्षांसाठी संघटनेच्या कामासाठी गेलेला मी १३ वर्षांनी परत आलो. लग्न केलं. सहा वर्षांतच पहिली पत्नी गेली. मग चार वर्षांनी दुसरं लग्न केलं. पण या सगळ्यांमध्ये आमचे लग्न, संसार, मुलंबाळं याबाबत तिच्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाहीत. पण या माउलीने त्याबद्दल कधीही खंत व्यक्त केली नाही.
लहानपणी सुटीमध्ये माहेरी निपाणीला आम्ही गेलं पाहिजे हा मात्र तिचा आग्रह कायम असे. त्यानुसार मी निपाणीमध्ये खूपवेळा राहिलो आहे. दत्ता सामंत यांच्या संपानंतर मिल बंद पडल्या. मग आईबाबांनी सांगितलं, तू आम्हाला गावाकडं घर बांधून दे. मग भुदरगड तालुक्यातील खानापूर या गावी मी घर बांधलं. हे दोघेही तिथं राहू लागले. मी १९९५ ला लग्न केलं आणि कोल्हापूरमध्ये वाय. पी. पोवारनगरमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले. तेव्हा दोघेही माझ्याकडे राहू लागले.
संभाजीनगरमध्ये १९९९ साली मी घर बांधलं. तेव्हापासून आई माझ्यासोबतच होती. राजकारणामुळं माझा आणि ऑडिटच्या कामामुळं बायकोचा खूप प्रवास सुरू असतो. त्यामुळे आईच घरी सर्व बघायची. कोणाचं येणं, जाणं. घरी आलेल्यांचं स्वागत करायला तीच पुढे असायची. मुलासारखी असलेली घरी अनेक मंडळी आहेत. पण घरातल्या कोणीतरी स्वागत केलेलं येणाऱ्यांना आवडतं. ते काम आई आवडीने करायची. दहा वर्षांपूर्वी ती घरात पडली. वॉकर घेऊन चालत होती. पण तिने कोणाच्या आगतस्वागतात कमी नाही केले. ती इथे घरात होती त्यामुळे मी निर्धास्त होतो. निश्चिंत होताे. मात्र आता मात्र तिची कायम उणीव भासत राहील.