पन्हाळा युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:13 AM2021-02-20T05:13:55+5:302021-02-20T05:13:55+5:30
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक पन्हाळा गडावर पन्हाळा युवा प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ...
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक पन्हाळा गडावर पन्हाळा युवा प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विधायक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या पन्हाळा युवा प्रतिष्ठानतर्फे यावेळी एक विधायक उपक्रम म्हणून प्रत्येक रक्तदात्याला एक झाडाचे रोप देण्यात आले. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय रक्तपेढीमार्फत रक्त संकलनाचे काम करण्यात आले. या रक्तदान शिबिराचा उपयोग पन्हाळा तसेच पन्हाळा बांधारीतील गरजू लोकांना मोठया प्रमाणात होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अटी व नियमांचे पालन करन रक्तदान शिबिर पार पडले.
पन्हाळा नगरीच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल यांच्याहस्ते पहिल्या रक्तदात्याला झाडाचे रोप देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपनगराध्यशा शरयू लाड, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, महिला व बालकल्याण सभापती पल्लवी नायकवडी, बांधकाम सभापती तेजस्विनी गुरव, नगरसेविका सुरेखा पर्वतगोसावी, सुरेखा भोसले, नगरसेवक अवधूत भोसले, चेतन्य भोसले, असिफ मोकाशी आणि पन्हाळा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिष्ठानमार्फत हे सलग पाचवे शिबिर असून, पन्हाळा युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे पन्हाळा पंचक्रोशीत कौतुक होत आहे.