कोल्हापूर : केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने मोबाईल ॲप विकसित केले असून बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी हे ॲप उपयुक्त असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२ वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र १० वी परीक्षांची अंतिम वेळापत्रके राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर २१ नोव्हेंबरपासून उपलब्ध केली आहेत. याशिवाय चालू वर्षाच्या परीक्षेत गणित व विज्ञानाच्या तीव्रतेच्या निकषात कोणताही बदल नाही. मंडळामार्फत विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या सोयीसाठी MSBSHSE हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमध्ये १० वी व १२ वी परीक्षेची वेळापत्रके, मार्च २०२४ परीक्षेच्या ठराविक विषयाच्या प्रश्नपत्रिका, तसेच विविध परिपत्रके शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होतील. १० वी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असतील.
ॲपची वैशिष्ट्ये
- ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध
- विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध
- नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकाल यासह अनुषंगिक बाबी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
- फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह अनुषंगिक सुविधा शाळांसाठी उपलब्ध
- याशिवाय अन्य नवीनतम- अद्यावत सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगिनशिवाय उपलब्ध
"केवळ वेळापत्रकच नाही तर परीक्षेसंबंधी उपयुक्त माहिती, सर्व परिपत्रके, अनुषंगिक सुविधा विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. -राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ