मुलीच्या वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट, वारेमाप खर्चाला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:02 PM2019-11-12T17:02:19+5:302019-11-12T17:03:47+5:30
मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कदम कुटुंबीयांनी नंदवाळ (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर नंदवाळ शाळेतील मुलांना पुस्तके वाटप केली. शाळेच्या ग्रंथालयाला शंभर दर्जेदार पुस्तके भेट दिली.
कोल्हापूर : मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कदम कुटुंबीयांनी नंदवाळ (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर नंदवाळ शाळेतील मुलांना पुस्तके वाटप केली. शाळेच्या ग्रंथालयाला शंभर दर्जेदार पुस्तके भेट दिली.
आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे, अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होणे गरजेचे आहे, ही गरज ओळखून वाचन कट्टा या संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी आपली कन्या राजनंदिनी हिच्या वाढदिवसानिमित्त नंदवाळ शाळेतील मुलांना मोफत पुस्तके वाटप केली. नंदवाळ शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली.
वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्या कन्येचा आनंद द्विगुणित करण्यासोबत समाजातील वाचनाची गरज ओळखून पुस्तकरूपी ज्ञानभेट देऊन एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. या उपक्रमाला वाचनकट्टा संस्थेचे उपाध्यक्ष संतोष वडेर, राजनंदिनीचे आजोबा सतबा कदम, आजी हिराबाई कदम, कपिल चौगुले, ओंकार कागिंकर, शाळेचे मुख्याध्यापक रंगराव गडकर, अर्जुन पाटील, वैशाली राव, संदीप मगदूम, आदी उपस्थित होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या दुनियेत मुले गुंतली आहेत. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. वाचन छंद बालपणापासून रुजविण्यासाठी आम्ही पुस्तके भेट दिली.
- वनिता कदम