यावर्षी मागणी किती?
यावर्षी मराठी माध्यमाची एकूण १६,२०,०५१, इंग्रजी माध्यमाची १२५०२, ऊर्दूची ४०१९४, कन्नडची ११७२, हिंदी माध्यमाची १०६७ इतक्या पुस्तकांची ‘युडायस’नुसार शासनाकडे मागणी केली आहे. त्यातून पुनर्वापराच्या जमा झालेल्या पुस्तकांची संख्या कमी होईल. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य कार्यालयाकडून घेण्यात येईल. जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या पाल्यांकडील पुनर्वापरासाठीची पुस्तके शाळास्तरावर जमा करावीत, असे आवाहन समग्र शिक्षा अभियानाचे कोल्हापुरातील सहायक कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम यांनी केले आहे.
चौकट
१४६९७ पालकांचा पुढाकार
जिल्ह्यात आतापर्यंत १४६९७ पालकांनी पुस्तके जमा केली आहेत. त्यात पहिली (पुस्तके ११७८), दुसरी (१२५९), तिसरी (१६२७), चौथी (२००१), पाचवी (२०८३), सहावी (२१०६), सातवी (२१७८), आठवी (२२६५) या इयत्तांची पुस्तके जमा झाली आहेत.
आम्ही परत केली; तुम्ही कधी करणार?
माझी मुलगी इयत्ता तिसरीला गेली आहे. तिची दुसरीची पुस्तके अन्य विद्यार्थ्यांना वापरता येतील. त्यामुळे ती पुस्तके शाळेमध्ये जमा केली आहेत. ज्या मुला-मुलींची जुनी, पण चांगल्या स्थितीत पुस्तके आहेत, त्यांनी ती शाळेत जमा करावीत.
-सागर जगताप, पालक, नंदगाव.
माझी मुलगी इयत्ता चौथीमध्ये प्रवेशित झाली आहे. इयत्ता तिसरीतील तिची पुस्तके चांगल्या स्थितीत होती. ही पुस्तके घरी विनावापर पडून राहिली असती. अन्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ती उपयुक्त ठरावीत या उद्देशाने संबंधित पुस्तके शाळेमध्ये जमा केली आहेत.
-किरण पाटील, पालक, दऱ्याचे वडगाव.
माझ्या मुलीची इयत्ता चौथीची पुस्तके शाळेत जमा केली आहेत. त्याचा निश्चितपणे अन्य मुला-मुलींच्या शिक्षणासाठी फायदा होईल. अन्य पालकांनी देखील अशी पुस्तके जमा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
-विशाल माने, पालक, वडकशिवाले.
शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
जुनी सुस्थितीतील पाठ्यपुस्तके संकलित करण्याबाबत शिक्षकांना आवाहन केले आहे. यंदा साधारणत: गेल्यावर्षीची २५ टक्के पुस्तके संकलित होतील. सध्या बहुतांश पालकांनी पुस्तके शाळेमध्ये जमा केली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुस्तक संकलनाची गती वाढेल.
-शंकर यादव, गटशिक्षणाधिकारी करवीर.