न्यूज नेटवर्क, करंजफेण : विक्रम पाटील
समाजामध्ये एकीकडे वृद्ध आई, वडिलांना पोटची मुले वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत असल्याची अनेक उदाहरण आपण पहात असतो. तर आई, वडिलांना ईश्वर मानून भक्त पुंडलिकाप्रमाणे जीवापाड प्रेम करून सेवा करणारी मुले देखील आपल्याला पहायला मिळतात. कोलोली (ता. पन्हाळा) येथील निवृत्त सुभेदार नंदू बंडू जाधव यांनी आई वत्सला जाधव यांच्यावर खासगी दवाखान्यात तीन महिने यशस्वी उपचार करून घरी आणल्यानंतर त्यांच्यावर फुलांची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी व वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली. वत्सला जाधव यांना तीन महिन्यांपूर्वी कोरोना झाल्याचा रुग्णालयातून अहवाल आला होता. वृद्धत्वामुळे उपचाराला शरीर साथ देत नसल्याने त्यांचे कुटुंब काळजीत होते. अशा बिकट स्थितीत आईला चांगले उपचार मिळवण्यासाठी माजी सैनिक नंदू जाधव यांनी मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात आईला दाखल केले. दरम्यान, मुंबईत तीन महिने यशस्वी उपचार करून घेतले. सध्या वत्सला यांची तब्येत ठीक झाली असल्याने रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले. त्या कोलोली मूळ गावी येताच मुलाचे आईबद्दलचे असलेले प्रेम पाहून गावकऱ्यांनी देखील अनोख्या पद्धतीने स्वागत केले. वत्सला जाधव यांना शाल, श्रीफळ, फेटा बांधून त्यांना पुष्पहार घालण्यात आला होता, तर गावातील सुहासिनींनी अंगावर फुलांची उधळण करून औक्षण केले. ग्रामस्थांनी हलगीचा निनाद व फटाक्यांची आतषबाजी करून गल्लीतून त्यांची विजयी मिरवणूक काढली. मेजर जाधव कुटुंबाचा वृद्ध मातेबद्दल असलेला सेवाभाव पाहून गावकऱ्यांनादेखील यावेळी गहिवरून आले. तीन महिन्यांच्या खडतर उपचारानंतर सुखरूप परत आलेल्या वत्सला आजीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून जाधव कुटुंबाचा देखील आनंद द्विगुणित झाला होता.
०५ कोलोली मदर नावाने फोटो
फोटो : कोलोली (ता. पन्हाळा) येथील वत्सला जाधव या कोरोनावर मात करून आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने अनोख्या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.