बाहुबलीतील आठ दशकांहून अधिक वर्षांची महावीर जयंतीची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:23 AM2021-04-25T04:23:49+5:302021-04-25T04:23:49+5:30
बाहुबली : बाहुबली (ता हातकणंगले ) हे जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. येथे जैन परंपरेतील उत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्याची ...
बाहुबली : बाहुबली (ता हातकणंगले ) हे जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. येथे जैन परंपरेतील उत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्याची परंपरा आहे. महावीर जयंतीदेखील अत्यंत भव्य स्वरूपात मिरवणूक व अनेक धार्मिक कार्यक्रमाने केली जाते; मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे ८६ वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. महावीर जयंतीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम व मिरवणूक रद्द केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद करून बाहुबलीमध्ये भाविकांना प्रवेश बंद केला आहे.
शासनाच्या आदेशाला प्रतिसाद देऊन जैन बांधव महावीर जयंती साधेपणाने घरीच साजरी करणार आहेत. यंदा कोरोनाच्या साथीमुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे यंदाची मिरवणूक व मंदिरांमधील महावीर जयंतीचे सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत; मात्र संबंधित जैन मंदिरांमध्ये पुजारी किंवा उपाध्ये यांच्यामार्फत महावीर जयंतीची पूजा, अभिषेक केले जाणार आहे.
कोट: महावीर जयंतीनिमित्त सर्व जैन बांधवांनी घरीच भगवान महावीर यांचे स्मरण, ध्यान, मंत्रपठण करावे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.
-बी टी बेडगे, कार्यकारी संचालक, बाहुबली ब्राह्मचर्याश्रम
चौकट : कोरोनाच्या काळात भगवान महावीर यांचा संदेश संयुक्तिक
'जगा व जगू द्या' या वैश्विक सद्भावनेचा संदेश सध्या कोरोना काळातही उपयुक्त आहे. जगा व जगू द्या तत्त्वानुसार आपण घरात राहून दुसऱ्या नागरिकांना संसर्ग होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.