ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी घेतली एक लाख १० हजारांची लाच

By उद्धव गोडसे | Published: October 3, 2023 08:48 PM2023-10-03T20:48:23+5:302023-10-03T20:49:06+5:30

जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे अटकेत, छत्रपती शिवाजी स्टेडियममधील कार्यालयात कारवाई.

bribe of 1 lakh 10 thousand was taken to clear the contractor bill in kolhapur | ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी घेतली एक लाख १० हजारांची लाच

ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी घेतली एक लाख १० हजारांची लाच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ठेकेदाराने क्रीडा कार्यालयास पुरवलेल्या साहित्याचे आठ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी एक लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारणारा जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (वय ५२, रा. राजगुरू हाउसिंग सोसायटी, विश्रामबाग, सांगली) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मंगळवारी (दि. ३) दुपारी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात ही कारवाई झाली. या कारवाईमुळे जिल्हा क्रीडा अधिका-यांचा लाचखोर कारभार चव्हाट्यावर आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील ठेकेदाराने कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास ॲल्युमिनियम प्रिंटिंग प्लेट पुरवण्याचे ई-टेंडर घेतले होते. दोन महिन्यांपूर्वी काम पूर्ण करून त्यांनी आठ लाख ८९ हजार २०० रुपयांची बिले सादर केली. मात्र, जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांनी बिल मंजूर करण्यास टाळाटाळ केली. चार दिवसांपूर्वी ठेकेदाराने भेटून विचारणा केली असता, त्यांनी बिल मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या १५ टक्के म्हणजे एक लाख २७ हजार ९५० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

तक्रारीची खातरजमा केल्यानंतर मंगळवारी जिल्हा क्रीडा कार्यालयात सापळा रचून, साखरे याला एक लाख १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. साखरे याच्या सांगलीतील घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपअधीक्षक सरदार नाळे यांच्यासह निरीक्षक बापू साळुंके, संजीव बंबरगेकर, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, मयूर देसाई, संदीप पवार आदींनी ही कारवाई केली.

साखरेची वादग्रस्त कारकीर्द

लाचखोर साखरे २०१८ पासून कोल्हापुरात कार्यरत आहे. त्यापूर्वी तो सोलापूर येथे कार्यरत होता. क्रीडा संकुलाच्या कामात त्याने मोठा हात मारल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू आहे. त्याच्या कार्यशैलीवर अनेक खेळाडू आणि क्रीडा संघटना नाराज होत्या.

Web Title: bribe of 1 lakh 10 thousand was taken to clear the contractor bill in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.