लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त झालेले असताना लाचखोरांची चलती मात्र कायम असल्याचे चित्र गेल्या सव्वातीन वर्षातील कारवाईवरून दिसून येते. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने तब्बल ९९ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले तर २००हून अधिक जणांना गजाआड करण्यातही यश आले. गेल्या १५ महिन्यात जिल्ह्यात ३४ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यामध्ये लाचखोरीत महसूल खाते सर्वात अग्रेसर राहिले आहे.
कोरोना महामारीमुळे सारेच संकटात आहेत, त्यात सर्वसामान्यांची रोजी रोटी थांबली, अनेकांच्या हाताला काम नाही, अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या अशा अवस्थेत सर्वसामान्य माणून हवालदिल झालेला असताना त्याच्या शासकीय कार्यालयातील कामावरही ‘मलई’ मिळवण्यात हे शासकीय नोकरदार आघाडीवर राहिले. शासकीय व निमशासकीय कार्यालयातही सर्वसामान्यांची अडवणूक अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल होऊन कारवाई केली जात असलीतरी लाचखोरीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे.
कोल्हापूर विभागाने गेल्या १५ महिन्यात केलेल्या कारवाईत प्रथम वर्गातील सहा बड्या अधिकाऱ्यावर लाचप्रकरणी कारवाई केली. यामध्ये मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याला तब्बल २० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. इतक्या मोठ्या रकमेचे लाच प्रकरण जिल्ह्यात प्रथमच घडल्याचे निदर्शनास आले. १५ महिन्यात लाचखोरीत १२ पंटर (खासगी व्यक्तीं)चा वापर केला, त्यांच्यावरही कारवाई केली.
लाचखोरीत महसूल अव्वल, पोलीसही जाळ्यात
जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यातील लाचखोरीच्या कारवाईत महसूल विभाग अव्वल ठरला. महसूलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नऊ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर त्यामध्ये ११ जणांवर कारवाई केली. याशिवाय दुसऱ्या क्रमांक पोलिसांचा लागतो. पोलीस विभागाच्या लाचखोरीच्या तब्बल ७ कारवाई झाल्या. त्यामध्ये १३ जणांवर अटकेची कारवाई झाली. याशिवाय जिल्हा परिषद, वीज मंडळ व आरोग्य विभागातही लाचखोरीचे प्रमाण अधिक असल्याचे कारवाईतून दिसून आले.
कोरोनाकाळात ‘महसूल’ची वरकमाई जोमात
- महसूल : ०९
- पोलीस : ०७,
- भूसंपादन : ०१
- जिल्हा परिषद : ०३
- वीज मंडळ : ०६
- मुद्रांक : ०१
- पशुवैद्यकीय विभाग : ०१
- वनविभाग : ०१
- आरोग्य विभाग : ०२
- आयकर विभाग : ०१
- मृदा व जलसंधारण : ०१
- होमगार्ड विभाग : ०१
कोणत्या वर्षी किती कारवाई
- २०१८ : ३४
- २०१९ : ३१
- २०२० : २७
- २०२१ : ०७ (जाने. ते मार्चअखेर)
कोट...
लाचविरोधी तक्रार देण्यासाठी प्रथम सर्वसामान्यांनी निर्भयपणे पुढे येण्याची गरज आहे. शासकीय- निमशासकीय कार्यालयातील कोणत्याही कर्मचारी अगर अधिकाऱ्याकडून लाचेच्या रकमेशिवाय कामाची अडवणूक होत असेल तर त्याविरोधी तक्रार द्यावी. तक्रारदाराचे कोणतेही काम थांबणार नाही. पुणे विभागात कोल्हापूरचे काम कौतुकास्पद आहे - आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.