संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:17 AM2021-07-01T04:17:46+5:302021-07-01T04:17:46+5:30
इचलकरंजी : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ग्रीन इचलकरंजीच्यावतीने नरेंद्र हौसिंग सोसायटीत वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरासमोर झाड लावावे ...
इचलकरंजी : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ग्रीन इचलकरंजीच्यावतीने नरेंद्र हौसिंग सोसायटीत वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरासमोर झाड लावावे व जगवावे म्हणून पर्यावरणपूरक झाडांची ५१ रोपे जाळी लावून रोपण करण्यात आली. या वेळी अण्णासाहेब शहापुरे, वासुदेव बांगड, पुष्पा मोरे, समीर नेमिष्टे आदी उपस्थित होते.
मूर्तिकार संघटना पदाधिकारी निवडी
इचलकरंजी : शहर मूर्तिकार संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. या वेळी संघटनेचे अध्यक्ष रवीकांत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. उपाध्यक्षपदी मनोज कुंभार, तर सचिवपदी राहुल आरेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत विठ्ठल कुंभार, किरण कुंभार, सतीश कुंभार, प्रकाश कुंभार, सुरेश कुंभार, सुनील कुंभार यांचा समावेश आहे.
कांबळेंचा बैल सजावट स्पर्धेत प्रथम
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे बेंदरानिमित्त रेसर ग्रुप व श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेने बैल सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेमध्ये आशिष कांबळे यांच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय राजू पाटील यांचा बैल, तृतीय ओवेज नदाफ यांचा व अमर अतकरे यांच्या बैलाने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
अलगीकरण केंद्रात साफसफाई
इंगळी : अलगीकरण केंद्रातील नागरिक येथील विद्यालयातील साफसफाई व स्वच्छतेच्या कामात व्यस्त आहेत. महादेव दादोबा गाताडे विद्यालयात कोरोना रुग्णांसाठी अलगीकरण कक्ष सुरू केले आहे. सध्या याठिकाणी अकरा लोक आहेत. या सर्वांनी विद्यालयाच्या खोल्या, स्वच्छतागृह, पटांगणसह सर्व शाळा परिसराची स्वच्छता केली आहे.