कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस सेवा ठप्प; प्रवाशांची गैरसोय
By भारत चव्हाण | Published: December 1, 2023 05:24 PM2023-12-01T17:24:51+5:302023-12-01T17:26:45+5:30
कर्मचाऱ्यांचा चर्चेला नकार, मागण्या मान्य करण्यावर ठाम
कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासह काही प्रमुख मागण्यासाठी महानगरपालिका परिवहन विभागाकडील (केएमटी) सर्व कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरांतर्गत बस वाहतुक सेवा खंडीत झाली. या संपामुळे केएमटी प्रशासनाचे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय प्रवाशी वर्गाचीही मोठी गैरसोय झाली. प्रशासनाने चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतू आधी मागण्या मान्य करा मगच संप मागे घेऊ, अशी आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने दिवसभरात या संपाबाबत काही तोडगा निघाला नाही.
केएमटीच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना राेजंदारी कर्मचारी म्हणून सेवेत घ्यावे, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या तातडीने द्याव्यात, वाहक-चालकांची रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
संपामुळे शुक्रवारी बुध्दगार्डन येथील डेपोतून एकही बस मार्गस्थ झाली नाही. सकाळी आठ वाजल्यापासून कर्मचारी बुध्दगार्डन डेपोसमोर जमू लागले. तेथे त्यांनी निदर्शने केली आणि दिवसभर तेथेच ठाण मांडले. या संपामूळे शहरांतर्गत तसेच काही गावातील बस सेवा खंडीत झाली. या संपाची पूर्वकल्पना नसल्याने सकाळी औद्योगिक वसाहतीत नोकरीला जाणाऱ्या कर्मचारी, विद्यार्थी तसेच अन्य प्रवाशी वर्गाची गैरसोय झाली. त्यांना ‘वडाप’चा आधार घ्यावा लागला.
कर्मचाऱ्यांचा चर्चेला नकार, मागण्या मान्य करण्यावर ठाम
महापालिका अतिरीक्त आयुक्त केशव जाधव, सहायक आयुक्त संजय सरनाईक यांच्यासह अन्य काही अधिकारी संपावरील कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी बुध्दगार्डन डेपोत गेले होते. त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला येण्याचे आवाहन केले. परंतू कर्मचाऱ्यांनी चर्चेला विरोध दर्शविला. आमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करा, असे सांगत कर्मचाऱ्यांनी चर्चेला ठाम नकार दिला. त्यामुळे जाधव, सरनाईक यांना चर्चेशिवाय तेथून माघारी परतावे लागले.