अटी गुंडाळून ठेवून सोयाबीन खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:30 AM2017-11-13T00:30:44+5:302017-11-13T00:33:16+5:30
कोल्हापूर : सोयाबीन खरेदीसाठी अधिकाºयांनीच अटी घालून घेतल्याने गोंधळ उडाल्याचे सांगत अटी गुंडाळून ठेवून सोयाबीनची तत्काळ प्रतिक्विंटल ३०५० रुपये आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘नाफेड’ दिले. सोयाबीनमधील आर्द्रता १२ ऐवजी १४ टक्के असली तरी खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
राज्यमंत्री खोत यांनी रविवारी शेती उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन खरेदी केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. कोल्हापूर, वडगांव व गडहिंग्लज बाजार समितीमधील किमान आधारभूत खरेदी केंद्रावर १०४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. एकूण उत्पादनाच्या तुलनेत फार कमी खरेदी असल्याचे राज्यमंत्री खोत यांच्या निदर्शनास आल्याने ते चांगलेच भडकले. दोन ठिकाणी सोयाबीनची तपासणी होत असल्याने शेतकºयांची कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास आणून देत जिल्ह्यात यंदा काढणीवेळी पाऊस राहिल्याने सोयाबीन काळे पडले आहे, त्याचीही खरेदीची मागणी बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे यांनी केली. खरेदी केंद्र व वेअर हाऊस अशा दोन ठिकाणी सोयाबीनची तपासणी न करता केवळ खरेदीच्या ठिकाणी तपासणी करा. सात-बारावरील नोंद न पाहता शेतकरी असल्याचा दाखला, आधारकार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्स पाहून खरेदी करा. अटी गुंडाळून ठेवा, सोयाबीनमध्ये घाण असेल तर त्याला चाळण द्या आणि खरेदी करा, असा आदेश खोत यांनी दिला. पहिल्यांदा चांगले सोयाबीनची खरेदी होऊ दे नंतर दुय्यम प्रतीचेही बघू, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, सदस्य परशुराम खुडे, नंदकुमार वळंजू, भगवान काटे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सालपे, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक मनोहर पाटील, आदी उपस्थित होते.
मंडल अधिकारी दाखले देणार
तलाठ्यांच्या संपामुळे शेतकºयांना दाखले मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यमंत्री खोत यांनी तत्काळ जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तलाठी संपावर असले तरी केवळ शेतकरी असल्याचा दाखला मंडल अधिकाºयांनी द्यावा, तशा सूचना करण्यास त्यांनी सुभेदार यांना सांगितले.
मी सांगतोय तोच अध्यादेश!
सगळ्या अटी बाजूला ठेवून सोमवारपासून सोयाबीन खरेदी करा, कोणत्याही परिस्थितीत खरेदी वाढली पाहिजे. जो अधिकारी यामध्ये हयगय करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. सुधारित अध्यादेशाची वाट पाहू नका; मी सांगतोय तोच अध्यादेश, अशा शब्दांत खोत यांनी अधिकाºयांना आदेश दिले.