राजकारण डोळ्यांपुढे ठेवून धनाजी यमकर यांचा कांगावा : मेघराज राजेभोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 06:33 PM2020-11-03T18:33:45+5:302020-11-03T18:36:08+5:30
उपाध्यक्ष धनाजी यमकर मद्यधुंद अवस्थेत बेलगाम वागत निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे राजकारण केले आहे. त्यातून संचालकांची व महामंडळाची बदनामी झाली असून त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी यमकर यांनी दूरध्वनीवर शिवराळ भाषेत केलेले संभाषण ऐकविण्यात आले.
कोल्हापूर : गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी कधीही पुढाकार घेतला नाही, उलट जी साखर संचालक चोरल्याचा ते कांगावा करत आहेत त्याचाच चहा ते कार्यालयात पितात, धनादेशाद्वारे पैशांचा अपहार करण्याचा प्रयत्न अंगलट आला म्हणून ते दुसऱ्यांवर आरोप करत आहेत.
मद्यधुंद अवस्थेत बेलगाम वागत त्यांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे राजकारण केले आहे. त्यातून संचालकांची व महामंडळाची बदनामी झाली असून त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी यमकर यांनी दूरध्वनीवर शिवराळ भाषेत केलेले संभाषण ऐकविण्यात आले.
चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत संचालकांवर साखर चोरल्याचा व धनादेश अपहार करण्याचा आरोप केला होता. त्यावर मेघराज भोसले यांनी खुलासा केला.
ते म्हणाले, संदीप पाटील या व्यावसायिकाने एक किलो पॅकिंगची १०० किलो साखर नेऊन १५० किलो साखर महामंडळाला परत केली अजूनही ती कार्यालयात आहे. धनादेशाच्या प्रकरणात अजूनही त्यांनी मला पुरावे दिले नाहीत, पोलीस तपासातही काही निष्पन्न झाले नाही, चित्रपट महामंडळ कला महामंडलच्याअंतर्गत काम करत नाही, त्याची स्वायत्तता अबाधित आहे.
रवी गावडे म्हणाले, गरजू कलाकारांसाठी आम्ही केलेल्या कामानंतर माझा भावी उपाध्यक्ष म्हणून उल्लेख झाल्याने त्यांनी राजकारण सुरू केले. साखर चोरून नेण्याइतकी आमची परिस्थिती वाईट झालेली नाही. उलट त्यांनी ज्युनिअर आर्टिस्ट, मॉब सप्लायचे काम लोकांकडून काढून घेतले आहे, आमची बदनामी केल्यानंतरही त्यांनी माझ्यासह अध्यक्षांना शिवीगाळ केली. यावेळी संजय ठुबे, शरद चव्हाण, अर्जुन नलवडे, भालचंद्र कुलकर्णी, सुरेखा शहा यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.
महिला कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक
भोसले म्हणाले, कार्यालयातील गरोदर महिला कर्मचाऱ्याने जबरदस्तीने व्हिडिओ करण्यास नकार दिल्यानंतर यमकर यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन कार्यालयाबाहेर काढले. त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला. याची तक्रारही विशाखा कमिटीत झाली आहे. यमकर यांना असे न वागण्याचा सल्लाही दिला होता. यावेळी या घटनेचे ऑडिओ व व्हिडिओ दाखविण्यात आला.