Kolhapur Lok Sabha Constituency: महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत प्रचाराचे नियोजन
By समीर देशपांडे | Published: April 6, 2024 05:17 PM2024-04-06T17:17:52+5:302024-04-06T17:18:26+5:30
कोल्हापूर : महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक येथील एका हॉटेलवर आज, शनिवारी दुपारी झाली. सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यावेळी ...
कोल्हापूर : महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक येथील एका हॉटेलवर आज, शनिवारी दुपारी झाली. सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महायुतीच्या प्रचाराला गती येण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात प्रचारात मागे पडलेली महायुती अधिक सक्रीय होईल असे सांगण्यात आले.
प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे मेळावेही सुरू झाले. परंतू मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सर्वांची एक बैठक घ्यावी असा सूर पुढे आला. त्यानुसार पाटील हे पुण्याहून शुक्रवारी रात्री कोल्हापूरमध्ये आले आणि शनिवारी सकाळी ही बैठक घेण्यात आली.
यावेळी पाटील, मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, आमदार राजेश पाटील, समरजित घाटगे यांनी प्रमुख मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, शिवाजीराव पाटील, सत्यजित कदम, जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने, सुधीर देसाई, विजय जाधव, राहूल देसाई, महेश जाधव, राहूल चिकोडे, प्रा. जयंत पाटील, ऋतुराज क्षीरसागर, उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.