शिये : प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्ग शिये ते पडळवाडी परिसरातून जाणार असून, या रस्त्याच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी हरकती घेऊनही प्रशासनाने त्यावर कोणतीच सुनावणी न घेता रस्त्याची मोजणी सुरू केली आहे. याचा निषेध म्हणून येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. शिये-पडळवाडीतून जाणारा महामार्ग रद्द करा, अशी मागणीही त्यांनी केली. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग हा शिये, भुयेवाडी, भुये, केर्ले, केर्ली, पडळवाडी गावातून जात आहे. शियेत ज्या परिसरातून हा मार्ग प्रस्तावित केला, त्या भागात महापुरावेळी पाणी आले होते. हा मार्ग झाल्यास महापूर काळात भरावामुळे पंचगंगेची पातळी वाढून शिये गावासह कोल्हापूर शहराला त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा महामार्ग हातकणंगले, वाठार, बोरपाडळे या जवळच्या मार्गावरून करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. शियेतून जाणाऱ्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असूनही त्यावर सुनावणी न घेता महामार्गाचे रेखांकन, मोजणी प्रक्रिया केली जात आहे. रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी पंचगंगेच्या पूरक्षेत्रातील पूररेषा न पाहता कायदा पायदळी तुडवत असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, पंचायत समिती माजी सदस्य कृष्णात पवार, अभिजित पाटील, परशराम शिंदे, भानुदास पाटील, देवदास लाडगावकर, संग्राम पाटील, के. बी. खुटाळे उपस्थित होते.
फोटो
: २३ शिये आंदोलन
प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनास हरकती घेऊनही त्यावर सुनावणी न घेता अधिकाऱ्यांनी रस्त्याची मोजणी सुरू केली आहे. त्याच्या निषेधार्थ शियेतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.