कॅन्सर लवकर शोधणाऱ्या सेन्सरचे संशोधन : कोल्हापुरातील दोन प्राध्यापकांचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:21 AM2018-03-11T00:21:50+5:302018-03-11T00:21:50+5:30
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : माणसाच्या शरीरातील ग्लुकोज लेव्हल जशी रक्ताच्या एका ड्रॉपची तपासणी करून समजू शकते तसे रुग्णाला कॅन्सर झाला आहे की नाही हे ओळखणे कसे शक्य होईल यासंबंधीचे संशोधन येथील न्यू कॉलेजमधील दोन प्राध्यापकांनी सुरू केले आहे.त्यांच्या या संशोधन प्रकल्पाचे महत्त्व ओळखून केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना तीन वर्षांच्या प्रकल्पासाठी ३० लाख रुपयांची संशोधनवृत्ती मंजूर केली आहे. कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास अनेकांचा जीव वाचविणे शक्य होणार आहे.
मुरगूडचे डॉ. अशोक चौगले व कणेरीमठ (ता. करवीर) येथील डॉ. प्रशांत पाटील अशी या प्राध्यापकांची नावे आहेत. चौगले हे बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएच.डी आहेत. पाटील यांनी फिजिक्समध्ये सॉलिड स्टेटमध्ये संशोधन केले आहे. संशोधनात अनेक वर्षे काम केलेल्या वरिष्ठ प्राध्यापकांना व त्यातही विद्यापीठाच्या स्तरांवर काम करणाºयाला एक्स्ट्रा म्युरल रिसर्च (ईएमआर) करण्याची संधी मिळते, परंतु चौगले व पाटील यांना हा संशोधन प्रकल्प कॉलेजस्तरांवरच मिळाला आहे.कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाल्यास रुग्णाचा तो अवयव काढून टाकल्यास त्याचा जीव वाचविणे शक्य होते.
त्यासाठीच निदान लवकर होणे आवश्यक असते. आता शरीरातील ग्लुकोज लेव्हल इतक्या सुलभ व सहजपणे तपासणारी यंत्रणा उपलब्ध झाली आहे, तशीच यंत्रणा किंवासेन्सर तयार करण्याचा या प्राध्यापकांचा प्रयत्न आहे. या संशोधनात नॅनो पार्टिकल्स व स्पेसिफिक अॅन्टी बॉडीजचा वापर करण्यात येणार आहे.त्याची सेन्सिटीव्हीटी जास्त असेल, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अत्यंत सूक्ष्म पातळीवरही कॅन्सरची लागण झालेली असेल तरी ते यामध्ये ओळखले जाईल. देशात कॅन्सरच्या विविध प्रकारांचे वाढते रुग्ण, त्याचा उपचाराचा होणारा प्रचंड खर्च
आणि मृत्यूचे प्रमाण याचाविचार करता या आजाराचे निदान लवकर होणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते. त्यादृष्टीनेया संशोधनाला देशपातळीवर आणि मानवी संपत्तीच्या दृष्टीनेही फारच महत्त्व येणार आहे.
कॅन्सरचे प्राथमिक निदान लवकर झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची संधी असते; परंतु आता आमच्याकडे उपचारासाठी येणाºया एकूण रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण त्यांचा कॅन्सर तिसºया स्टेजला असताना डॉक्टरकडे येतात. फक्त २० टक्केच रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात आजार असताना डॉक्टरपर्यंत येतात. या आजारात निदान लवकर होणे हे अत्यंंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही संशोधन होत असेल तर ते उपयुक्तच ठरू शकेल.
- डॉ. सूरज पवार, प्र्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ