कोल्हापुरातील पाचशे व्यापारी, कर्मचाऱ्यांची काेरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:03+5:302021-07-08T04:17:03+5:30
कोल्हापूर : शहरातील सर्व व्यवहार यापुढील काळातही सुरळीत सुरु रहावेत, यासाठी कोरोना संबंधीचे सर्व नियम स्वत:हून काटेकाेरपणे पाळण्याचा संकल्प ...
कोल्हापूर : शहरातील सर्व व्यवहार यापुढील काळातही सुरळीत सुरु रहावेत, यासाठी कोरोना संबंधीचे सर्व नियम स्वत:हून काटेकाेरपणे पाळण्याचा संकल्प व्यापाऱ्यांनी केला आहे.त्याची सुरुवात बुधवारी महानगरपालिका व चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे करण्यात आली. पहिल्याच दिवशी जनजागृतीसह सुमारे पाचशे व्यापाऱ्यांनी स्वत:हून आरटीपीसीआर चाचणी करुन घेतली.
कोरोनाची खबरदारी घेऊनच यापुढील काळात व्यवसाय करायचे आहेत. त्यासाठी जनजागृतीचा भाग म्हणून बुधवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे मास्कचा वापर करणे, हात नेहमी सॅनिटाईज करणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीकरणाचे पोस्टर्स महाद्वार रोडवरील दुकानांत चिकटवून व्यापारी व ग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. अशी पोस्टर्स शहरातील सर्व व्यापारी पेठांत चिकटविण्यात येणार आहेत.
व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व कोल्हापूर शहरातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन सर्व व्यापार कायमचा चालू राहावा करिता कोल्हापूर महानगरपालिकातर्फे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न संघटनांच्या वतीने कोल्हापूर चेंबरचे कार्यालय, शिवाजी मार्केट व टिंबर मार्केट या ठिकाणी बुधवारी एकाच दिवशी आरटीपीसीआर चाचणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. जवळपास ५०० व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करुन घेतली. रेडिमेड गारमेंट असोसिएशन, टिंबर व्यापारी असोसिएशन, फुटवेअर असोसिएशन, शिवाजी मार्केट व्यापारी असोसिएशन या संघटनांनी कॅम्पचे संयोजन केले होते.
शहरातील सर्व व्यापार आता सुरु झाला असून तो कायमचा चालू रहावा यासाठी सर्व व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर आपली आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे परवाना अधीक्षक राम काटकर, समन्वय अधिकारी राजेंद्र पाटील, सचिन जाधव, चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, खजानिस हरीभाई पटेल, संचालक अजित कोठारी, राहुल नष्टे, प्रशांत शिंदे, संपत पाटील, प्रकाश पुणेकर, अनिल धडाम, कमलाकर पोळ, गजानन पोवार व विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०७०७२०२१-कोल-बाजारपेठ
ओळ - कोल्हापूर शहरातील व्यापारी व त्यांचे कर्मचारी यांची महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी आरटीपीसीआर चाचणी केली.