सेनापती कापशीच्या सरपंच श्रद्धा कोळी यांचे जात प्रमाणपत्र वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:42+5:302021-09-15T04:28:42+5:30
ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्रद्धा कोळी या इतर मागासवर्गीय महिला गटातून परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार ...
ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्रद्धा कोळी या इतर मागासवर्गीय महिला गटातून परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून थेट जनतेतून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या.
विरोधी गटाच्या उमेदवार वंदना संजय शिंदे यांंनी कोळी यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सदर प्रकरण अंतिम तपासणीकरिता सांगली जातपडताळणी कार्यालयाकडे पाठविले होते.
जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने सरपंच कोळी यांचे मूळ गाव हजारवाडी (ता.पलूस) येथे प्रत्यक्ष भेट देऊन कोळी यांचे वडील, भाऊ, नात्यातील संबंधितांच्या पुरावे व शालेय कागदपत्रांच्या आधारे इतर मागासवर्गीय समाजाचे असल्याची माहिती न्यायालयाकडे दिली. सादर केलेली कागदपत्रे, दक्षता पथकाचा अहवाल, यांचा विचार करता श्रद्धा कोळी यांचा जातीचा दाखला सिद्ध होत असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
या निकालाने विरोधी गटाचा दावा फोल ठरल्याचे सरपंच श्रद्धा कोळी यांनी सांगितले. यावेळी महेश देशपांडे, मोहन मोरे, उमेश देसाई, सतीश कोळी, तुकाराम भारमल, मकरंद कोळी, सुनील नाईक, यशवंत नाईक आदी उपस्थित होते.