कोल्हापूर , दि. २६ : कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्ती संवर्धनासाठी व आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देवस्थान समितीने चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, ते गुरुवारपासून कार्यान्वित झाले आहेत. येथील हालचालींवर देवस्थानच्या कार्यालयासह जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधूनही लक्ष ठेवता येणार आहे.
कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराप्रमाणे देवीच्या गाभाऱ्यातही सीसीटीव्ही लावले जावेत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत होती. त्यासाठी विविध संस्था-संघटनांनी आंदोलनेही केली होती. मंदिरातील गाभाऱ्याची नियमित देखभाल होते की नाही, आर्द्रतेचे नियम पाळले जात आहेत की नाही यासह विविध गोष्टींबाबत सीसीटीव्ही लावले जावेत, अशी मागणी जोर धरत होती.
खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही या गोष्टीचा पाठपुरावा करून सीसीटीव्हीबाबत देवस्थान समिती व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यानच्या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नुकतेच नवरात्रौत्सवाच्या आधी गाभाऱ्यामध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु काही तांत्रिक कारणांस्तव गाभाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने कॅमेरे बसविण्यात आले नव्हते.
पहिल्या टप्प्यामध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते; पण ते पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत अथवा त्यांचे प्रक्षेपण जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पाहता येत नाही, असा आरोप काही भक्त समित्यांकडून केला जात होता. या दोन कॅमेऱ्यांसह आणखी दोन कॅमेरे गुरुवारी देवस्थान समितीकडून गाभाऱ्यामध्ये बसविण्यात आले.
पूर्वीच्या कॅमेऱ्यांतील तांत्रिक दोषांचेही निवारण करण्यात आले असून, एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी कार्यान्वित झाले आहेत. या कॅमेऱ्यांमधून देवस्थान समिती कार्यालय व जुना राजवाडा पोलीस चौकीमध्ये थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाच्या मुख्य उद्देशाने हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गाभाऱ्यामध्ये आर्द्रतेचे नियम पाळले जात आहेत का?, मूर्तीची व गाभाऱ्याची स्वच्छता नियमित ठेवली जात आहे की नाही, यावर लक्ष राहावे यासाठीच कॅमेरे बसविल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.