गारगोटी : गारगोटीसह भुदरगड तालुक्यात मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किल्ले भुदरगड आणि रांगणा येथून शिवज्योत घेऊन जाण्यासाठी जिल्ह्यातील शिवभक्तांनी गर्दी केली होती.
संयुक्त भुदरगड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे येथील क्रांतिज्योत परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली.
पहाटे पाटगाव येथून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवजन्मकाळ सोहळा, पाळणा गायन, सुंठवडा वाटप करण्यात आले. आमदार प्रकाश आबिटकर यांचे हस्ते शिवपुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवज्योतीचे पूजन माजी आमदार के. पी. पाटील यांचे हस्ते झाले; तर दीपप्रज्वलन राहुल देसाई यांच्या हस्ते झाले.
यावेळी भुदरगड पंचायत समितीचे सभापती कीर्ती देसाई, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच स्नेहल कोटकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, पंचायत समितीचे सदस्य अजित देसाई, आदी उपस्थित होते.
सकाळी मॅरेथॉन स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत राधानगरी, कागल, आजरा तालुक्यांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम व डॉ. बिपीन गोंजारी यांच्या हस्ते झाले. यावेळी गारगोटी व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ घाटगे, उपाध्यक्ष सुरेश सूर्यवंशी उपस्थित होते. त्यानंतर रंगभरण स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन राहुल देसाई, पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर, संदीप पाटील-मांगोलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पांडुरंग कुपटे यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले; तर सायंकाळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, विजयराव चौगुले, सचिन भांदिगरे, नंदकुमार शिंदे, संदीप पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे आनंदराव देसाई यांच्या हस्ते झाले. संयुक्त भुदरगड शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक मच्छिंद्र मुगडे, सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष राजिगरे, उपाध्यक्ष शशिकांत वाघरे, सागर चव्हाण, सुशांत माळवी, अक्षय मोहिते, संदीप देसाई, रोहित इंदुलकर यांच्यासह अनेक तरुणांनी शिवजयंती सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ : शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना आमदार प्रकाश आबिटकर. प्रकाश पाटील, कीर्ती देसाई, स्नेहल कोतकर, मच्छिंद्र मुगडे, आदी उपस्थित होते.