कोल्हापूर : सर्वांचेच लाडके , आराध्य दैवत व चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे दैवत असणाºया श्री गणेशाची आज,शुक्रवारी प्रतिष्ठापना होत आहे. अकरा दिवसांच्या या मांगल्यपूर्ण सणाची लगबग केवळ घरगुती न राहता ती सर्वत्र दिसू लागली असून, गुरुवारी संध्याकाळीच अनेक तरुण मंडळे आणि नागरिकांनी घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, बापट कॅम्प आणि बाजारातही गर्दी केली होती.
राज्यात गणेशोत्सव अबालवृद्धांच्या आवडीचा सण आहे . त्यामुळेच या सणाच्या निमित्ताने एकीकडे वैयक्तिक पातळीवर गणेशाच्या स्वागतासाठी तयारी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे अविभाज्य अंग बनलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांची धावपळ वाढली आहे. अवघ्या त्यामुळे थर्माकोल खरेदी, कटाईपासून ते सजावटीचे साहित्य नेण्यासाठी बाजारपेठेतही गर्दी दिसून आली.
मध्यवर्ती बसस्थानकावर गावाकडे गणेशोत्सवासाठी जाणाºया भक्तांची दिवसभर गर्दी होती. तर तर पुण्या-मुंबईकडे पण मुळचे करवीरनिवासी असलेले अनेक नागरीक शहरात दाखल झाले आहेत. येणाºया संपूर्ण आठवड्यात गणरायाचे वास्तव्य घरोघरी राहणार असल्याने त्याच्या तयारीत कुटुंबच्या कुटुंब रंगल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
अगदी आरतीसाठीच्या झांजांपासून ते चिपळ्यांची शोधाशोध, प्रसादासाठीच्या पदार्थांचे नियोजन, ठेवणीतील टोप्या, फटाक्यांची खरेदी, लाईटच्या माळा सोडण्यापासून ते कागदी फुले, कारंजे या माध्यमांतून आपल्या घरातील गणपतीही कसा आकर्षक पद्धतीने दिसेल याचीच अनेकांच्या चेहºयावर काळजी दिसत होती. गुरुवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. वाटत होते असाच हा पाऊस सायंकाळपर्यंत राहील. मात्र, दुपारी चारनंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे दिवसभराचे पावसाचे वातावरण अगदी स्वच्छ होऊन उने आली.
अनेकांनी सायंकाळी पापाची तिकटी , महाद्वार रोड, राजारामपुरी चौक आदी ठिकाणी साहीत्य खरेदीसाठी गर्दी केली होती. उशिरा रात्रीपर्यंत घरगुती गणेशाचे आगमनही काहींनी केले तर काहींनी आज, शुक्रवारी गणेशाच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यक र्त्यांच्या धावपळीला तर अंत नसल्याचे दिसून आले. काही तरुण मंडळांनी गुरुवारीच मूर्ती आणल्या. आज, शुक्रवारी मूर्ती आणण्यासाठीच्या ट्रॅक्टरचे नियोजन, पूजेसाठीचे पाहुणे, त्यांची निमंत्रणे, प्रशासनाच्या कागदपत्रांची पूर्तता यांत कार्यकर्ते गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. यानिमित्ताने घरोघरी आणि शहर, गावांतही एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, अकरा दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी कोल्हापूर नगरी सज्ज झाली आहे. गुरुवारी रात्री काही तरुण मंडळांच्या गणेशमूर्तीचेही आगमन झाले. यात दिलबहार तालीम मंडळ, मंगळवार पेठेतील जंगी हुसेन तालीम मंडळ, गुलाब गल्ली येथील लेटेस्ट तरुण मंडळ, संभाजीनगरातील संभाजीनगर तरुण मंडळाचा राजा अशा एक ना अनेक मंडळांनी आदल्या दिवशीच गणेशमूर्तीं प्रतिष्ठापनेसाठी वाजत गाजत नेल्या.