राम मगदूम गडहिंग्लज: चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार शिवाजीराव पाटील हे २४ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी 'महायुती'तर्फे लढलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा पराभव केला. गेल्या १५ वर्षात बंडखोराला यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.'महायुती'चे उमेदवार आमदार पाटील विरुद्ध 'महाविकास आघाडी'तील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या डॉ.नंदिनी बाभूळकर-कुपेकर, 'भाजपा'चे बंडखोर शिवाजीराव पाटील, 'काँग्रेस'चे बंडखोर विनायक उर्फ पाटील, 'जनसुराज्य शक्ती पक्षा'चे मानसिंगराव खोराटे यांच्यातच पंचरंगी लढत झाली. मात्र, पहिल्यापासून शेवटच्या फेरीपर्यंत आमदार पाटील विरुद्ध शिवाजीराव पाटील यांच्यातच खरी लढत झाली.राज्य पातळीवरील धोरणाप्रमाणे 'महायुती'ची उमेदवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार पाटील यांनाच मिळाली. परंतु,त्यांच्याविरुद्ध शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरी केली.तव्दत,'महायुती'चा घटक पक्ष राहिलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानेही मानसिंगराव खोराटे यांना उमेदवारी दिली.त्यामुळे आमदार पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांना माजी मंत्री भरमूअण्णा पाटील,भाजप चंदगड तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष संतोष तेली, शांताराम पाटील, रवींद्र बांदिवडेकर,अॅड.सुरेश माने,डी.एल.भादवणकर,अँड.विजय कडूकर,श्रीशैल नागराळ, चंदू किरमिटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली.भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, माजी जि.प.सदस्य अड.हेमंत कोलेकर यांनी युती धर्म पाळून आमदार पाटील यांना पाठिंबा दिला. तरीदेखील त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
फडणवीस यांचे निकटवर्तीय!नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील हे इनाम सावर्डे येथील शेतकरी कुटुंबातील असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. मुंबई येथील भाजपप्रणीत माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.भाजपच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले.
शिवाजीराव पाटील यांना २४,१३४ मतांची आघाडीउमेदवार- पक्ष - मिळालेली मते शिवाजीराव पाटील - भाजप बंडखोर - ८४,२५४-विजयीराजेश पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - (६०,१२०) डॉ.नंदिनी बाभूळकर-कुपेकर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- (४७,२५९)मानसिंग खोराटे - जनसुराज्य शक्ती पक्ष - २२१०७अप्पी पाटील - काँग्रेस बंडखोर - २४५८२