चांदोली, वारणा धरणग्रस्तांचा १ मार्चपासून पुन्हा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:06 AM2021-02-20T05:06:17+5:302021-02-20T05:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊन काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले, परंतु गेल्या अकरा महिन्यात केलेल्या मागण्यांची पूर्तता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॉकडाऊन काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले, परंतु गेल्या अकरा महिन्यात केलेल्या मागण्यांची पूर्तता झालेली नसल्यामुळे आता चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्त येत्या १ मार्चपासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडणार आहेत. श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्यातर्फे मारुती पाटील यांनी तसे निवेदन गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे.
चांदोली व वारणा प्रकल्पात विस्थापित झालेल्यांना निर्वाह भत्यासह जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन, वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्याच दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आणि लॉकडाऊन जाहीर झाल्याने यात स्वत: लक्ष घालतो, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आश्वासित केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर निर्वाह भत्यांचे काही प्रमाणात वाटप सोडले तर इतर प्रश्नांकडे प्रशासनाने लक्षच दिलेले नसल्याने या प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळेच त्यांनी आता न्यायासाठी पुन्हा एकदा कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.