एस.टी.चा भार ‘प्रभारीं’वर : कोल्हापूर विभागातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:51 AM2017-11-21T00:51:46+5:302017-11-21T00:54:21+5:30
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाºयांवर सुरू आहे
प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाºयांवर सुरू आहे. विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय वाहतूक अधीक्षक या प्रमुख तीन पदांसह विभागातील वीसहून अधिक अधिकाºयांची विविध पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती व बदलीमुळे या रिक्त जागांचा कार्यभार सध्या प्रभारी अधिकाºयांवर सोपविला आहे. अतिरिक्त कारभारामुळे कोल्हापूर विभागाचे सध्याचे कामकाज ‘ढकल स्टार्ट’ गाडी सारखेच सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन असर ‘एस. टी.’चा नावलौकिक आहे. मात्र, अंतर्गत अडचणींमुळे एस. टी. तोट्यात चालली आहे. त्यामध्येच पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्याने राज्यभरातील विभागात कामांचा बोजवारा उडताना दिसत आहे. हीच परिस्थिती कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळत आहे.
कोल्हापूर विभागातील विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभागीय वाहतूक अधीक्षक ही तिन्ही प्रमुख पदे रिक्त आहेत. त्यांचा परिणाम येथील दैनंदिन कामकाजावर होत आहे. विभाग नियंत्रक नवनीत भानप दि. ३१ आॅक्टोबरला सेवानिवृत्त झाले. मात्र, सेवानिवृत्तीपूर्वी ते चार महिने रजेवरच असल्याने प्रमुख निर्णय गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित आहेत.
विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. आगारातील वाहतुकीसंदर्भातील, प्रवाशांची जादा गाडीची मागणी, अपघात झालेल्या चालकांची सर्व प्रकरणे त्यामुळे प्रलंबित आहेत. विभागीय वाहतूक अधीक्षक पद गेले सहा महिने रिक्त आहे. त्यामुळे वाहकांची अपराध प्रकरणे प्रलंबित आहेत. तिन्ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कोल्हापूर विभागाची स्थिती कप्तान नसलेल्या जहाजासारखी झाली आहे. कोल्हापूर विभागातील प्रभारी कारभार संपुष्टात आणून कायमस्वरूपी अधिकारी नेमून प्रवासी व कर्मचाºयांची गैरसोय टाळावी, अशी मागणी एस. टी. संघटना व प्रवाशांतून होत आहे.
कोल्हापूर विभागातील आगारनिहाय रिक्त पदे
कोल्हापूर आगार : सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक एक दीर्घ रजेवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक चार मंजुरीपैकी एकही नियुक्त नाही.
संभाजीनगर आगार : आगार व्यवस्थापक नाही.
गडहिंग्लज आगार : आगार व्यवस्थापक रजेवर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाहीत.
गारगोटी आगार : सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक दोनपैकी एक नियुक्त, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नियुक्त नाही
मलकापूर आगार : आगार व्यवस्थापक नाही, वाहतूक निरीक्षक दोनपैकी एक नियुक्त
चंदगड आगार : आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक नाहीत
कुरुंदवाड आगार : सहाय्यक वाहतूक अधीक्षक, दोन वाहतूक निरीक्षक नाहीत.
कागल आगार : सहाय्यक वाहतूक अधीक्षक नाही. +