कोल्हापूर : कासारवाडी (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय बाबूराव कदम हे मंत्रालयातील गृहनिर्माण विभागात लिपिकपदी कार्यरत आहेत. त्यांचे हस्ताक्षर कोरीव, वळणदार आणि सुंदर आहे. त्यांच्या हस्ताक्षरातील एक फाइल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गुरुवारी आली. त्यावर त्यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कदम यांना वर्षा निवासस्थानी भेटायला बोलवून घेऊन त्यांचे कौतुक केले. कोरीव हस्ताक्षराची कला जोपासण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकाने कदम भारावून गेले.
गेल्या अडीच वर्षांपासून दत्तात्रय कदम हे मंत्रालयातील गृहनिर्माण विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी कार्यालयीन कामाबाबतच्या एका फाइलवर स्वत:च्या हस्ताक्षरामध्ये ‘केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रस्ताव संदर्भ’ यासह ‘आपले सरकार’ आणि विभागाचे नाव लिहिले होती. ही फाइल गुरुवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या टेबलवर आली. त्यावरील सुंदर हस्ताक्षर पाहून त्यांनी प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडे हे हस्ताक्षर कोणाचे आहे, याबाबत विचारणा केली. सचिवांनी कदम यांचे नाव सांगितले. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कदम यांना वर्षा निवासस्थानी भेटायला बोलविले. या हस्ताक्षराबद्दल त्यांचे कौतुक केले. सध्या टायपिंगच्या जमान्यात लिहिणे कमी झाले आहे. त्यामुळे ती कला जपा आणि कॅलिग्राफी शिकण्याचा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिला.
प्रतिक्रिया
माझ्या वळणदार आणि सुंदर हस्ताक्षर सर्वांना आवडते. हे हस्ताक्षर पाहून थेट मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला बोलविणे आणि कौतुक करणे, हा माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता. मी खूप आनंदित झालो आहे.
-दत्तात्रय कदम
फोटो (२४०९२०२१-कोल-दत्तात्रय कदम मंत्रालय) : कोरीव, वळणदार हस्ताक्षराबद्दल मंत्रालयातील गृहनिर्माण विभागातील लिपिक दत्तात्रय कदम यांना वर्षा निवासस्थानी बोलवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे गुरुवारी कौतुक केले.
फोटो (२४०९२०२१-कोल-दत्तात्रय कदम मंत्रालय ०१, ०२) : मंत्रालयातील गृहनिर्माण विभागातील लिपिक दत्तात्रय कदम यांचे कोरीव, वळणदार हस्ताक्षर पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.