हसन मुश्रीफांच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे फोटो झळकले; चर्चेला उधाण, मुश्रीफ म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 04:08 PM2023-06-23T16:08:37+5:302023-06-23T16:22:02+5:30
आमदार हसन मुश्रीफ यांनी केला खुलासा
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोमुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विरोध पक्षनेते अजित पवार असे चौघांचेच फोटो असल्याने उलट सुलट चर्चा सुरु होती. यावर आमदार हसन मुश्रीफ यांनी खुलासा करुन गैरसमज करून घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
गडहिंग्लजमध्ये येत्या २८ जूनला महाराष्ट्र सरकार आणि हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह शरद पवार, अजित पवार यांचेच फोटो होते. त्यामुळे राजकीय चर्चेना ऊत आला.
याबाबत खुलासा करताना मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली म्हणून त्यांचे फोटो अन् राष्ट्रवादी म्हणून पवार साहेब आणि अजित दादांचे फोटो आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेण्याची गरज नाही, ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ईडीने याआधी मुश्रीफ यांच्या घरावर तसेच जिल्हा बँक, साखर कारखान्यावर छापेमारी केली आहे. कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरून ते ईडीच्या रडारवर आहेत.