कोल्हापूर : अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना महाराष्ट्र शासन अजून पकडू शकलेले नाही. हे मारेकरी सरकारला पकडायचे आहेत की नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या २४ तारखेला कोल्हापूर दौऱ्यात द्यावे अशी मागणी डाव्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी केली.
पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील बिनखांबी गणेश मंदिरापासून ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. त्याच्या समारोपावेळी ही मागणी करण्यात आली.
मार्क्सवादी कमुनिष्ट पक्षाचे राज्य नेते उदय नारकर म्हणाले,‘देशात व राज्यात नरेंद्र व देवेंद्र यांचे खोटी आश्वासन देवून सत्तेवर आलेले सरकार आहे. त्यांना जाती-जातीमध्ये तेढ वाढवून त्यातून राजकारण करायचे आहे. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आता तपास ठप्प झाला आहे.
सरकारला त्याचे कांही सोयरसुतक नाही. त्यामुळे सरकारवर रेटा वाढविण्यासाठी मंत्रालयाला घेराव घालण्याचे आंदोलन करावे लागणार आहे. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री कोल्हापूरात येत आहेत. त्यांनी या हत्येच्या तपासाची सद्यस्थिती काय आहे यासंबंधीची माहिती समाजाला दिली पाहिजे.’
पानसरे-दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना न पकडणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत ही फेरी काढण्यात आली. त्यामध्ये सुरेश शिपूरकर, दिलीप पवार, व्यंकप्पा भोसले, प्राचार्य टी.एस.पाटील, संभाजीराव जगदाळे, सतिश पाटील, शाहीर राजू राऊत, जीवन बोडके,सीमा पाटील, तनुजा शिपूरकर, रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, स्वाती कृष्णात, रमेश आपटे, धनंजय सावंत,राजाराम धनवडे, अमर माने, रवि जाधव, ए.बी.जाधव, वसंतराव पाटील, शंकर काटाळे,नवनाथ मोरे, मुन्ना सय्यद,अजित थोरात आदीसह मान्यवर सहभागी झाले.
अशाही बांधीलकी..प्रा. एन.डी. पाटील किडनीच्या आजाराने रुग्णालयात दाखल होते. नुकतेच ते औषधोपचार करून घरी आले आहेत परंतू अशा स्थितीतही या मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी होवून त्यांनी वैचारिक निष्ठा व चळवळीची बांधीलकी दाखवून दिली. वॉकर घेवून चालत जावून त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा मुठी आवळून तीव्र शब्दात निषेध केला.
डिसेंबरमध्ये कसबा बावडापुढील मॉर्निंग वॉक २० डिसेंबरला कसबा बावड्यातील भगवा चौकातून काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.