वळीवाच्या पावसाने घेतला कोगनोळी येथील बालकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:45 AM2020-10-12T10:45:23+5:302020-10-12T10:51:02+5:30
rain, kolhapur, boy, death परतीच्या वळीवाचा पाऊस शनिवार दि. ११ रोजी जोरदार बरसला. यामुळे लोखंडे गल्ली येथील तुडुंब भरून वाहणाऱ्या गटारीतून दोन वर्षाच्या बालकाचा वाहून जाऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण कोगनोळी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी तरुण मंडळाच्या सुमारे दोनशे तरुणांनी शोध मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली.
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी - परतीच्या वळीवाचा पाऊस शनिवार दि. ११ रोजी जोरदार बरसला. यामुळे लोखंडे गल्ली येथील तुडुंब भरून वाहणाऱ्या गटारीतून दोन वर्षाच्या बालकाचा वाहून जाऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण कोगनोळी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी तरुण मंडळाच्या सुमारे दोनशे तरुणांनी शोध मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील लोखंडी गल्लीतील रहिवाशी महेश कोकणे यांचा दोन वर्षाचा मुलगा चिरंजीव सक्षम हा धुवाधार पावसाच्या दरम्यान शेजारी असणाऱ्या सुतार यांच्या घरी खेळण्यासाठी गेला होता. पाऊस संपल्यानंतर गटार पार करत असताना तो गटारीत पडून वाहून गेला.
ही घटना घडल्यानंतर सुतार यांच्या कुटुंबियातील एका वृद्ध महिलेच्या लक्षात आले. इकडेतिकडे सक्षमचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे तो गटारीत पडून वाहून गेल्याचा संशय बळावला. त्यानंतर लोखंडे गल्ली सह कोगनोळी येथील शेकडो तरुणांनी गटारी मध्ये उतरून शोध मोहीम सुरू केली.
भरधाव वेगाने वाहत असणाऱ्या गटारीतील पाण्यामुळे शोध मोहिमेत अनंत अडचणी येत होत्या. त्यावर मात करण्यासाठी शेवटी गटारी फोडून त्या दुसऱ्या गटारीला जोडण्यात आल्या व शोध कार्य पुढे सुरू ठेवण्यात आले. तब्बल पाच तासानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सक्षम याचा मृतदेह हंचिनाळ रोडवरील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या ओढ्याजवळ आढळून आला.
ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. मृतदेह हाती लागताच त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यांचा तो आक्रोश पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर रात्री उशिरा निपाणी येथील गांधी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून सक्षमचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. हंचिनाळ रोडवरील स्मशानभूमी शेजारीच या दोन वर्षाच्या सक्षमचा दफनविधी पार पडला.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घटना घडलेल्या ठिकाणापासून ते मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंत पाहणी करून पंचनामा केला. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, वीरकुमार पाटील यांच्यासह लोखंडे गल्लीतील सर्व नागरिक उपस्थित होते. दोन वर्षाच्या चिमुकल्याचा वळवाच्या पावसाने बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गटारीच्या पाण्याची दिशा बदलण्याची गरज
राष्ट्रीय महामार्गालगतच्या बिरदेव वसाहतीपासून सर्व पाणी अंबाबाई मंदिरानजीकच्या तलावांमध्ये एकत्र होते. तो तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन पाणी महादेव गल्ली मार्गे लोखंडी गल्लीतून पुढे जाते. पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्याने त्रस्त झालेले लोखंडे गल्ली सह परिसरातील नागरिक अशा वळवाच्या पावसामुळे किंवा इतर वेळेच्या पावसामुळे गटारीपेक्षा पाणी रस्त्यावरूनच भागातून वाहत जात असते.
यामुळे आतापर्यंत तलावातील मासे गटारीतून वाहून गेल्याच्या घटना चर्चेत होत्या परंतु काल चक्क दोन वर्षांचा बालकच गटारीतून वाहून गेल्याची घटना घडल्याने नागरिकातून या येणार्या पाण्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शुक्रवारी होता सक्षमचा वाढदिवस
शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सक्षम चा दुसरा वाढदिवस साजरा केला जाणार होता. त्याची तयारी ही कुटुंबीयांकडून सुरू करण्यात आली होती. परंतु तत्पूर्वीच वळवाच्या पावसाने तुडुंब वाहणाऱ्या गटारीतून वाहून जाऊन सक्षमचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे.