पाचगाव : कंदलगाव कमान ते चित्रनगरीपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. शहरापासून जवळच असलेल्या भारती विद्यापीठ, केआयआयटी कॉलेज, चित्रनगरी, कंदलगाव, गोकूळ शिरगाव एमआयडीसी, याठिकाणी ये जा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. पंधराशे ते दोन हजार कर्मचारी गोकूळ शिरगाव एमआयडीसीला याच मार्गावरून ये-जा करत असतात. परंतु रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठाले खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडत आहे. खड्डे चुकविताना या रस्त्यावर अनेक वेळेला छोटे-मोठे अपघात घडले आहेत. वारंवार या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने अनेकांच्या पाठीच्या मणक्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
भारती विद्यापीठ शेजारी आरटीओ पासिंग सेंटर असल्याने ट्रकसारखी अवजड वाहने याच रस्त्यावरून धावतात. त्यामुळे हा रस्ता जास्तच खराब झाला आहे.
चौकट : रस्त्याचे रुंदीकरण कधी
पुणे- बेंगलोर हायवेपासून जवळच असल्याने अनेक वाहनधारक याच रस्त्याचा आधार घेतात. त्यातच हा रस्ता रुंदीने इतका छोटा आहे की समोरून एखादे ट्रकसारखे अवजड वाहन आले तर मोटरसायकलस्वारालाही गाडी बाजूला घ्यावी लागते. संबंधित प्रशासनाकडे नागरिकांनी या रस्ता रुंदीकरणाची मागणी करूनदेखील याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कोट : कंदलगाव कामानीपासून ते चित्रनगरी पर्यंतच्या या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. गोकूळ शिरगाव एमआयडीसीला जाणारा कामगार वर्ग रात्री अपरात्री या रस्त्यावरून ये -जा करत असतो, त्यामुळे अनेकवेळा रात्री खड्ड्यामुळे गाडी पंक्चर होण्याचे प्रकार घडतात. अशावेळी वाहनधारकांना त्रास होतो. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण करून दुरुस्त करावा.
-अंबाजी पाटील, कंदलगाव.
कोट : कामावर जाताना हाच रस्ता जवळचा असल्याने येथूनच ये-जा करावी लागते. परंतु रस्त्यात एवढे खड्डे पडले आहेत की खड्डा चुकवायचा की समोरून आलेले वाहन हेच समजत नाही.
-अनिल रणदिवे, कर्मचारी ,एमआयडीसी गोकूळ शिरगाव
फोटो : १२ कंदलगाव रस्ता
ओळ :
कंदलगाव कमानीपासून ते चित्रनागरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.