‘सर्किट बेंच’ चा लढा तीव्र करणार, कोल्हापूरसह सहा जिल्ह्याच्या दौऱ्याला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:17 PM2017-11-04T12:17:58+5:302017-11-04T12:28:44+5:30
कोल्हापूर ,दि. ०४ : गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यातील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीच्या तारखेच्या घोळात हा प्रश्न पुन्हा रखडला आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ‘सर्किट बेंच’चा लढा तीव्र करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला आहे. शुक्रवारी कृती समितीने सांगलीचा दौरा करुन येथील वकीलांशी चर्चा केली. यावेळी मुखमंत्र्यांवर दबाव आनण्यासाठी चळवळ पुढे वाढविण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. तसेच डिसेंबर २०१७ अखेर सहा जिल्ह्याचा मेळावा घेवून आंदोलनाची पुढील रणनिती निश्चित करण्याचा निर्णय झाला.
सहा जिल्ह्यातील वकील गेली तीस वर्ष कोल्हापूरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. रॅली, उपोषण, बेमुदत काम बंद आंदोलने केली. मंत्री मंडळासोबत बैठका घेतल्या. परंतू आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनाचे गाजर दाखिवले जात आहे.
सर्किट बेंच मागणीच्या चर्चेबाबत तारीख निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांंच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी दोन दिवसांत तारीख निश्चितपणे कळवू, असे आश्वासन प्रा. पाटील यांना दिले होते. तेव्हापासून या तारखेकडे सहा जिल्ह्यातील वकिलांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या तारखेच्या घोळात हा प्रश्न पुन्हा एकदा मागे पडला आहे. त्यामुळे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक प्रशांत शिंदे, अॅड. शिवाजीराव राणे, संपत पवार, किरण पाटील यांनी आता पुन्हा संघर्ष करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. येथील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याशी चर्चा केली. यावेळी सर्किट बेंच ची चळवळ पुढे सुरु ठेवली पाहिजे. त्यासाठी नवी रणनिती आखण्याचा निर्णय घेण्यात आला. मुखमंत्र्यांवर दबाव टाकण्यासाठी हा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेत डिसेंबरच्या अखेरीस मेळावा घेण्याचा निर्णय झाला.
नवा अध्यक्ष नियुक्तीचा प्रस्ताव
खंडपीठ कृती समितीच्या अध्यक्षाची जबादारी ही कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा अध्यक्षावर आहे. दरवर्षी हे अध्यक्ष बदलत असतात. त्यामुळे खंडपीठ कृती समितीचा अध्यक्ष हा सहा जिल्ह्याचा एकमेव असावा. तो प्रश्न मार्गी लागेपर्यंत कायमस्वरुपी असावा. यासाठी सहा जिल्ह्याची बैठक घेवून नवा अध्यक्ष नियुक्त करावा, असा प्रस्ताव सांगलीचे अॅड. हारुगडे यांनी कृती समितीसमोर मांडला. त्यावर मेळाव्यात चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
साताऱ्यात सोमवारी बैठक
‘सर्किट बेंच’प्रश्नी पुन्हा नव्या जोमाने लढा उभारण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला आहे. सांगलीचा दौरा पार पडला. आता सोमवारी (दि. १३) सातारा जिल्ह्याचा दौरा आहे. येथील वकीलांची चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्याचा दौरा कृती समिती करणार आहे.